scorecardresearch

कर्ज ॲपच्या माध्यमातून तरुणाची बदनामी करून फसवणुकीचा प्रयत्न

तरुणाने १५ हजार रुपयांच्या कर्जासाठी ॲपवर अर्ज केला होता. त्याच्या खात्यात ९ हजार रुपये जमा झाले होते. ते पैसे परत मागण्यासाठी त्याला धमकीचे फोन येत होते.

fraud
कर्ज ॲपच्या माध्यमातून तरुणाची बदनामी करून फसवणुकीचा प्रयत्न (प्रातिनिधिक छायाचित्र)

कर्ज ॲपच्या माध्यमातून एका २५ वर्षांच्या तरुणाची बदनामी करून फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणुकीसह बदनामी आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला.

हेही वाचा- बीकेसीतील जंबो करोना केंद्रातील निष्काळजीविरोधात याचिका; ३६ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी

तक्रारदार तरुण मालाड परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या मोबाइलवर एक कर्ज मिळवून देणारे ॲप डाऊनलोड करून पडताळणीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याच्या माहितीसह स्वत:चे छायाचित्र अपलोड केले होते. त्यानंतर त्याने १५ हजार रुपयांच्या कर्जासाठी ॲपवर अर्ज केला होता. २९ जानेवारी रोजी त्याच्या बँक खात्यात सुमारे नऊ हजार रुपये जमा झाले. त्यानंतर शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी त्याला तातडीने सात हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्याने १५ फेब्रुवारीपर्यंत पैसे जमा करतो असे सांगितले. यावेळी त्याला चार वेगवेगळ्या मोबाइलवरून पैसे जमा करण्यासाठी धमकी येत होती. पैसे जमा केले नाहीत तर त्याची अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी त्याला देण्यात आली.

हेही वाचा- मुंबई : तळीयेतील बाधित कुटुंबांसाठीच्या ६६ घरांचे काम मार्चमध्ये पूर्ण, २०० घरांच्या प्रकल्पाला अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाकडून वेग

या धमकीनंतर त्याला एका अज्ञात व्यक्तीने त्याचे मॉर्फ केलेले एक अश्लील छायाचित्र पाठविले. ते छायाचित्र त्याच्या कुटुंबीयांसोबत इतरांना पाठवून त्याची बदनामी करू, असा संदेशही पाठवण्यात आला. दुसऱ्या दिवशी तेच छायाचित्र त्याच्या मैत्रिणीसह नातेवाईकांना पाठवून या व्यक्तीने त्याची बदनामी केली. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदाराने कुरार पोलिसांकडे धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि संबंधित चारही व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी ४२०, ५००, ५०४, ५०६ भादवी कलमांसह ६६ डी, ६७ माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 11:40 IST
ताज्या बातम्या