इंग्रजीच्या प्राध्यापकाकडून विद्यार्थ्यांना ग्रह-ताऱ्यांची माहिती

मुंबई : आकाश निरीक्षणावर आधारलेला खगोलशास्त्र विषय दुर्बिणीशिवाय शिकणे कठीण. तासनतास निरीक्षणाच्या आधारे शिकावयाचा हा विषय शाळेत शिकविताना मर्यादा येते. हा अडथळा दूर करण्यासाठी मुंबईतील एक इंग्रजीचे प्राध्यापक गेली २५ वर्षे शहरी व ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण करण्याचे काम करत आहेत. तेही स्वखर्चाने. आपली दुर्बीण खांद्यावर मारून भिंगरीसारख्या फिरणाऱ्या या अवलियाने आतापर्यंत तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत.

वरळीच्या नेहरू तारांगण येथे मानद व्याख्याता म्हणून व्याख्याने देणाऱ्या या अवलियाचे नाव आहे, प्रा. एस. नटराजन. माहीममध्ये राहणाऱ्या नटराजन यांना आठव्या वर्षी वडिलांनी ध्रुव ताऱ्याचे दर्शन घडविले. तेव्हापासून ते आकाशाच्या आणि तिथल्या तारेतारकांच्या प्रेमातच पडले. ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. गेली २५ वर्षे ते शालेय विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबाबत जनजागृती करत आहेत. आता प्रत्येक जिल्ह्य़ातील गावागावांत जाण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. संशोधक तयार होऊन त्यांना करिअरच्या संधी निर्माण व्हाव्यात, असा यामागे हेतू आहे.

विद्यार्थ्यांना अवकाशाविषयी खूप जिज्ञासा असल्याचे लक्षात आल्यानंतर १९९२ साली त्यांनी याविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मुलांना आपल्या दुर्बिणींमधून आकाश दर्शन घडवणे आणि खगोलशास्त्राची माहिती देण्याचे कार्य ते विनामूल्य करत आहेत. सुरुवातीला प्रा. नटराजन यांनी उद्याने, समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना दुर्बिणीतून अकाशगंगेचे दर्शन घडवण्यास सुरुवात केली. माहितीसाठी पर्यटकांची झुंबड उडत असे.

पुढे ते शाळा, महाविद्यालये, निवासी संकुलांमध्ये जाऊन व्याख्याने देऊ लागले. आजपर्यंत साडेतीन हजार शाळा, महाविद्यालयांना त्यांनी भेट दिली आहे. यात ते आकाशगंगेची माहिती देतात. दुर्बिणीतून त्याचे दर्शन घडवतात. ग्रह, ताऱ्यांचा जन्म आणि अंत कसा होतो, खगोलशास्त्राबाबत असलेल्या अंधश्रद्धांविषयी जाणीवजागृतीही करतात.

खगोलशास्त्र हा विषय अत्यंत व्यापक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात त्याची पुरेशी माहिती दिली जात नाही. भारतात खगोलशास्त्राकडे करिअर म्हणून पाहणारे खूप कमी विद्यार्थी आहेत. त्यामुळे संशोधनाचे प्रमाणही खूप कमी आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. 

– प्रा. एस. नटराजन