मुंबई : बोरिवलीच्या नॅन्सी बस डेपो परिसरात नुकतेच ‘इंडियन बुल फ्रॉग’चे म्हणजेच ‘पावसाळी बेडका’चे दर्शन झाले आहे. भारतात आढळणाऱ्या मोठ्या बेडकांच्या प्रजातींपैकी एक असलेल्या या बेडकांचे वैशिष्ट्य म्हणजे, पावसाच्या सुरुवातीस नर बेडूक काही तासांसाठी आपला नेहमीचा मातकट रंग बदलून पिवळसर रंग धारण करतात. त्यांच्या गळ्याखालच्या निळ्या आवाजाच्या पिशव्या या काळात सक्रिय होतात आणि त्याद्वारे मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न तो करतो.
हा दुर्मीळ क्षण बोरीवलीतील नॅन्सी बस डेपो परिसरात वन्यजीव छायाचित्रकार गौरव पाटील यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. याआधी या प्रजातीचे बेडूक मैदानांमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याचे दिसून येत होते. मात्र, अलीकडील काळात झपाट्याने वाढलेल्या शहरीकरणामुळे अशी उघडी मैदाने कमी होत चालली असून, त्यांच्या नैसर्गिक प्रजननस्थळांवर मर्यादा येत आहेत. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात असे प्रसंग दुर्मीळ होत असले तरी अजूनही काही ठिकाणी निसर्ग आपली खूण सोडून जातो. दरम्यान, पावसाळ्याच्या सुरुवातीला नर इंडियन बुल फ्रॉग त्यांच्या प्रजनन कालावधीत आपला सामान्य मातकट रंग बदलून तेजस्वी पिवळसर रंग धारण करतात. त्यांच्या गळ्याखाली असलेल्या निळ्या रंगाच्या आवाजाच्या पिशव्यांद्वारे मादींना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो.
या बेडकांच्या आवाजामुळे त्यांच्या उपस्थितीची चाहूल लागते, पण प्रत्यक्ष दर्शन दुर्मीळच असते. इंडियन बुल फ्रॉग हा प्रामुख्याने भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आढळतो. याचा आकार इतर भारतीय बेडकांपेक्षा मोठा असतो; लांबी सुमारे १५ ते १७ सेमी पर्यंत असते. सामान्यतः रंग मातकट किंवा फिकट हिरवटसर असतो, परंतु पावसाळ्यात नर अत्यंत तेजस्वी पिवळा रंग धारण करतो. याच्या डोळ्यांवर असलेला उभा काळसर पट्टा आणि टायगरप्रमाणे रेषा असलेल्या पाठीमुळे त्याला ‘टायगरिनस’ हे नाव मिळाले आहे.
प्रजनन व जीवनचक्र
पावसाळ्याच्या सुरुवातीला नर बेडूक मोठ्याने ‘क्रोकिंग’ करून मादींना आकर्षित करतात.
प्रजनन सहसा पाणथळ जागांमध्ये होते. तलाव, सखल भागात साचलेलं पाणी, यांसारख्या ठिकाणी.
मादी एकावेळी ३००० ते २०,००० अंडी घालते, जी काही दिवसांत उबून पिल्ले बाहेर पडतात.
आहार आणि शिकारी वर्तन
हा बेडूक कीटक, अळ्या, छोटे उंदीर, सरडे, पक्ष्यांची पिलं, अगदी लहान बेडूकसुद्धा खातो.
याच्या आहाराची श्रेणी अत्यंत व्यापक असून तो संधी मिळताच कोणत्याही हालचाल करणाऱ्या लहान प्राण्यांवर झडप घालतो
पर्यावरणीय महत्त्व
कीटक नियंत्रणात मदत करणारा हा बेडूक शेतीसाठी फायदेशीर ठरतो.
मात्र त्याचा अतिवापर किंवा चुकीच्या ठिकाणी प्रसार जैवसाखळी विस्कळीत करू शकतो.
शहरीकरणाचा प्रभाव
नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे प्रजनन ठिकाणे कमी झाली आहेत.
दिवे, सिमेंटचे रस्ते, ध्वनीप्रदूषण यामुळे या बेडकांची नैसर्गिक प्रजोत्पादन क्रिया विस्कळीत होते.