मुंबई : जीवनसौंदर्याने नटलेल्या आणि निसर्गाशी नाते सांगणाऱ्या कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांची अनोखी मैफल अनुभवण्याची संधी रसिकांना शुक्रवार, २७ जून रोजी ‘बाकीबाब’ या कार्यक्रमातून मिळणार आहे. बा. भ. बोरकर यांच्यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केलेल्या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त हा कार्यक्रम होणार असून त्याच्या प्रवेशिका मंगळवारपासून उपलब्ध होणार आहेत.
‘लोकसत्ता’तर्फे नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती केली जाते. त्याच मालिकेत बा. भ. बोरकर यांच्यावरील विशेषांक प्रसिद्ध होत आहे. त्यात बोरकरांची कविता, साहित्य आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या नामवंतांचे लेख आहेत. अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अनोखी काव्यमैफल अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. काही चित्रफिती, काव्यगायन, कवितांचे सादरीकरण आणि या सर्वांना एकत्र बांधणारे निवेदन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. कार्यक्रम मोफत असून उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे. प्रवेशिका मंगळवारपासून उपलब्ध होणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे सकाळी ९.३० ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते ८ या कालावधीत प्रवेशिका मिळू शकतील.
विशेष कार्यक्रमाच्या प्रवेशिका उद्यापासून उपलब्ध