मुंबई : राज्यात नऊ लाखांहून अधिक रिक्षा – टॅक्सी चालक-मालक असताना आनंद दिघे रिक्षा – टॅक्सी कल्याण मंडळात मात्र अद्याप फक्त नऊ हजार(१ टक्का) चालकांची नोंदणी झाली आहे. सदस्यत्वासाठी ५०० रुपये नोंदणी शुल्क आणि वार्षिक वर्गणी ३०० रुपये भरणे बंधनकारक असल्याने रिक्षा – टॅक्सी चालकांनी कल्याणकारी मंडळाकडे पाठ फिरवली आहे.

राज्य सरकारने रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने कल्याणकारी मंडळाची जानेवारी २०२५ मध्ये स्थापना केली. असंघटित वाहतूक कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमासाठी सरकारने ५० कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी दिला आहे.

धर्मवीर आनंद दिघे कल्याण मंडळाने ३१ मार्चपर्यंत राज्यातील १७ आरटीओंमधील ९ हजार २२३ रिक्षा आणि टॅक्सी चालकांची नोंदणी केली आहे. या मंडळामार्फत चालकांना निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती आणि मदत दिली जाणार आहे. कल्याण आणि ठाणे आरटीओ सदस्य नोंदणी करण्यात आघाडीवर आहेत. अनुक्रमे १ हजार ६५४ आणि १ हजार ०२० सदस्यांची नोंदणी झाली आहे.

मंडळाच्या विशेष पोर्टलद्वारे नोंदणी करण्यासाठी चालकांना आधार कार्ड आणि मोबाईल नंबर नोंद करावा लागतो. ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या चालकांसाठी १० हजार सेवानिवृत्ती मानधन, मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतींसाठी आर्थिक मदत आणि जीवन व अपंगत्व विमा संरक्षण यांसारख्या लाभांचा समावेश आहे.

राज्यात एकूण नोंदणीकृत चालक- ९ लाख

आतापर्यंत सदस्य नोंदणी- ९ हजार २२३

कल्याण – १ हजार ६५४

ठाणे-१ हजार ०२०

ताडदेव – ४१४.

अंधेरी – ३७८

वडाळा – २७५

बोरिवली – ६३९

पनवेल – २४६

सिंधुदुर्ग – २१७

रत्नागिरी – २९८

कोल्हापूर – २५६

सांगली – २४१

पुणे – ३८४

सोलापूर – २२६

पिंपरी-चिंचवड – ३६७

सातारा – २८०

औरंगाबाद – २५०

लातूर – २००

आर्थिक अडचणीतील चालकांकडून प्रवेश आणि वार्षिक फी घेणे हा अन्याय आहे. चालकांनी कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यासाठी आरटीओ जबरदस्ती करत आहे. याचा निषेध करण्यासाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती राज्यातील सर्व आरटीओवर बुधवारी ८ एप्रिल रोजी ऑटोरिक्षा चालक मालकांचा मोर्चा काढणार आहे.—--शशांक राव,अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सी मेन्स युनियन.