मुंबई : राज्य शासनाने प्रवासी वाहतूक चालकांच्या कल्याणासाठी महत्त्वाचा निर्णय घेत, ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’च्या कार्यक्षेत्रात मोठा विस्तार केला आहे. या निर्णयानुसार मंडळाचे नाव आता ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे करण्यात आले आहे. यामुळे ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांबरोबरच ओला, उबर यांसारख्या ॲप-आधारित कॅब चालक, पर्यटन वाहन चालक तसेच, इतर सर्व प्रवासी वाहने चालवणारे चालकही मंडळाचे सदस्यत्व घेऊ शकणार आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो चालकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रवासी वाहन चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने हे सदस्यत्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, आर्थिक सहाय्य आणि इतर लाभांचा फायदा घेण्यासाठी सर्व पात्र चालकांनी विलंब न करता नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (मुंबई पूर्व) यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ॲप-आधारित कॅब चालकांसह प्रवासी वाहतूक क्षेत्रातील सर्व चालकांना एकाच कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याने हा निर्णय चालकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

सदस्यत्वासाठी अर्ज

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी सर्व पात्र प्रवासी वाहन चालकांना तातडीने सदस्यत्व नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. चालकांना नोंदणीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार असून, ऑफलाइन नोंदणीसाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाऊन अर्ज करता येईल.