उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. दर रविवारी ते युजर्ससाठी देश-विदेशातील एखादे अनोखे व प्रेक्षणीय पर्यटन स्थळ शोधून त्याचा व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र, या रविवारी त्यांनी कोणत्याही दूरवरच्या ठिकाणाचा व्हिडिओ शेअर न करता, थेट देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आपल्या ‘मुंबई’चा उत्सवी थाट जगासमोर मांडला. गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या जल्लोषात न्हाऊन निघालेल्या मुंबईचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी “मला मुंबईकर असल्याचा अभिमान आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या खास पोस्टवर आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद महिंद्रांची पोस्ट काय होती?

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ‘X’ (ट्विटर) हँडलवर मुंबईतील गल्लीबोळांत घुमणारा ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि दहीहंडीला थर रचणाऱ्या गोविंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, “या रविवारी मी कोणत्याही अनोख्या किंवा परदेशी पर्यटन स्थळाबद्दल पोस्ट करत नाहीये. कारण सणासुदीचा हा काळ सुरू होताच, सगळे रस्ते आता थेट मुंबईकडेच येतात! मला मुंबईकर असल्याचा प्रचंड अभिमान आणि आनंद आहे.”

ज्योतिरादित्य शिंदेंची पोस्ट काय आहे?

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळाली असतानाच, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही पोस्टला री-पोस्ट करत मुंबईबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले. शिंदे यांनी महिंद्रा यांच्या मताशी पूर्ण सहमती दर्शवत मराठी आणि इंग्रजीत ट्विट केले.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी लिहिले, “अगदी बरोबर आनंदजी! मुंबईची ओढच अशी आहे! आयुष्यात तुम्ही कुठेही जा, सणासुदीच्या या दिवसांत मन फक्त आणि फक्त मुंबईसाठीच आसुसलेले असते…”

सोशल मीडियावर ‘मराठी’ आणि ‘मुंबई’ बाणा व्हायरल…

मुंबईत सध्या घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे गोपाळकाल्याचा थरारही रंगत आहे. अशा वातावरणात देशातील दोन मोठ्या दिग्गजांनी मुंबईतील लोकसंस्कृती आणि उत्सवाच्या या ऊर्जेचे उघडपणे कौतुक केल्यामुळे मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नेटिझन्स या संवादावर भरभरून कमेंट्स करत असून “मुंबईचा सण-उत्सव आणि येथील बाणा खरोखरच जगात अद्वितीय आहे,” अशा प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.