नक्षलवादी कनेक्शनबाबत पोलिसांनी दाखवलेल्या पत्रांमध्ये तथ्य नाही-आनंद तेलतुंबडे

कॉम्रेड प्रकाश किंवा अन्य एकाही माओवादी नेत्याला मी ओळखत नाही. मला कोणतेही पत्र मिळालेले नाही असे तेलतुंबडे यांनी म्हटले आहे

आनंद तेलतुंबडे (संग्रहित छायाचित्र)

देशभरातील नक्षलवादी समर्थकांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पुरावा म्हणून काही पत्रं वाचून दाखवली. या पत्रांमध्ये त्यांनी कॉम्रेड तेलतुंबडे यांनी रोना विल्सन यांना लिहिलेले पत्रही वाचून दाखवले. मात्र या पत्रांमध्ये काहीही तथ्य नाही ही पत्रे धादांत खोटी आहेत असा दावा दलित लेखक आनंद तेलतुंबडे यांनी केला आहे. तेलतुंबडे यांच्या घरावरही मंगळवारी पोलिसांनी छापा मारला होता.

पोलिसांनी पत्रकार परिषदेत जी काही पत्रं दाखवली त्यापैकी कुठलंही पत्र आपल्याला आलं नाही. कॉम्रेड आनंद हे पॅरिसमध्ये ज्या परिषदेसाठी उपस्थित राहिले होते त्यासाठी आर्थिक मदत पुरवल्याचा उल्लेख माओवादी नेते प्रकाश यांनी लिहिलेल्या पत्रात असल्याचाही दावा पोलिसांनी केला होता. दलित समस्यांवर आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यासाठी दरवर्षी १० लाख रूपये जमा करण्याचा निर्णय घेतल्याचीही नोंद या पत्रात होती. याबाबत विचारले असता पोलीस दररोज सत्य साईबाबांच्या हातचलाखीसारख्या खोट्या गोष्टी सादर करत आहेत असे उत्तर तेलतुंबडे यांनी दिले. विदेशी दौऱ्यांबाबतची योग्य कागदपत्रे आपल्याकडे आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉम्रेड प्रकाश किंवा अन्य एकाही माओवादी नेत्याला मी ओळखत नाही. मला कोणतेही पत्र मिळालेले नाही असे तेलतुंबडे यांनी म्हटले आहे. माओवादी नेते पत्र लिहून संवाद साधतात हा पोलिसांचा दावाच निराधार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्नन गोन्साल्विस, सुधा भारतद्वाज, अरूण परेरा या सगळ्यांना झालेली अटक योग्यच होती असेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच देशभरात कथित नक्षलींवर करण्यात आलेल्या कारवाईचं समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट होता असं सांगितलं. हजारो कागदपत्रे पाच माओवाद्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ताब्यात घेण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र पोलिसांनी यासाठी ज्या पत्रांचा आधार घेतला ती पत्रे तथ्यहीन आहेत असा दावा आता आनंद तेलतुंबडे यांनी केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anand teltumbde says police shows false letters about activists

ताज्या बातम्या