मुंबई : रक्तदान हे स्वैच्छिक असल्याने रक्तदान शिबिरांमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू देणे हे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेकायदेशीर आहे, असे असताना अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला नामांकित कंपनीचे जवळपास ३ ते ४ हजार रुपये किमतीचे घड्याळ भेट म्हणून देण्यात आले.
शिबिरात जे.जे. महानगर रक्तपेढी, नायर रुग्णालय रक्तपेढी, रेडक्रॉस आणि जे.जे. रुग्णालय रक्तपेढी अशा शासकीय रक्तपेढ्या असतानाही रक्त संक्रमन परिषदेचे नियम धाब्यावर बसविण्यात आले.
रिलायन्स समुहाचे अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ग्रँट रोड येथील केनेडी ब्रिजजवळ, नाना चौक येथील अवसर बँक्वेटमध्ये यंगस्टार मित्र मंडळातर्फे अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे रक्तदान शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत असतानाही या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून घड्याळाची भेट मिळवण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे सभागृहामध्ये रक्तदानासाठी लावलेल्या खाटा अपुऱ्या पडल्या.
नामांकित कंपनीचे जवळपास ३ ते ४ हजार रुपयांचे घड्याळ मिळणार असल्याने अवघ्या दोन तासांत या शिबिरामध्ये ४०० नागरिकांनी रक्तदान केले. दुपारी ४ वाजेपर्यंत १५०० नागरिकांनी रक्तदान केले होते. तर सभागृहाबाहेरही मोठ्या प्रमाणात रांगा लागली होती. त्यामुळे हे रक्तदान शिबिराची वेळही वाढविण्याची शक्यता वर्तवली जात होती.
राज्य व केंद्र सरकारचे नियम पायदळी
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या परिपत्रकानुसार रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची भेटवस्तू देण्यात येऊ नये. स्वैच्छिक रक्तदान शिबिरामध्ये आयोजकांकडून रक्तदात्यांना भेटवस्तू दिल्यास संबंधित रक्तपेढीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र असे असतानाही या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या जे.जे. महानगर रक्तपेढी, नायर रुग्णालय रक्तपेढी, जे.जे. रुग्णालय रक्तपेढी या शासकीय रक्तपेढ्यांकडूनच नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. त्यामुळे या सरकारी रक्तपेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संचालकांकडून प्रत्यक्ष कारवाईस टाळाटाळ
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. सुहास मोहनाळकर यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी मला याबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे मी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याची तपासणी केल्यानंतरच निर्णय घेईन, असे सांगितले.
आयोजकांकडून भरून घ्यावे लागते हमीपत्र
रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यापूर्वी रक्तपेढ्यांना आयोजकांकडून रक्तदान हे स्वैच्छिक, विना मोबदला आणि रक्तदात्याच्या स्व-इच्छेनुसार आहे व कुठलाही मोबदला रोख स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरुपात दिला जाणार नाही. तसेच परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रतिकात्मक भेटीशिवाय इतर कोणतीही भेटवस्तू दिली जाणार नाही. या मार्गदर्शक तत्त्वांच्या सर्व नियम आणि अटी व शर्तीचे पालन करू असा मजकूर असलेले हमीपत्र रक्तपेढ्यांना आयोजकांकडून भरून घेणे आवश्यक असते.
