मुंबई : जगभरात प्रसिद्ध असलेला घड्याळाचा लक्झरी ब्रँड जाकोब ॲण्ड को या कंपनीने नुकतेच उद्योगपती अनंत अंबानी यांच्यासाठी विशेष घड्याळ तयार केले आहे. अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पाच्या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेल्या घड्याळात विविध प्राणी, मौल्यवान रत्ने आणि अनंत अंबानी यांची प्रतिमा खास आकर्षणाचा भाग आहे. या घड्याळाची किंमत सुमारे १.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे १२ कोटी रुपये) इतकी असू शकते.

भारतातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी लक्झरी घड्याळांचे शौकीन असल्याचे सर्वकश्रूत आहे. पोशाख, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत घड्याळ परिधान करणे ही त्यांची खासियत आहे. अनंत अंबानी यांनी त्यांच्या लग्नात डिझायनरला अत्यंत महागडे घड्याळ भेट स्वरूपात दिले होते. यांचे घड्याळांप्रती असलेले आकर्षण लक्षात घेऊन अमेरिकेतील नामांकित कंपनी ‘जाकोब ॲण्ड को’ने अनंत यांच्यासाठी खास रत्नजडित घड्याळ तयार केले आहे. अंबानी यांच्या गुजरातमधील वनतारा या प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरवर आधारित संकल्पनेवर ह घड्याळ साकारण्यात आले आहे. कौशल्य, कला, उद्देश यांची सांगड घालून या मौल्यवान घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे.

निसर्ग, शक्ती आणि संरक्षण यांचे प्रतिक

या घड्याळाची रचना हिरव्या कॅमोफ्लाज संकल्पनेत करण्यात आली असून ती पूर्णतः मौल्यवान रत्नांनी साकारण्यात आली आहे. डायलच्या मध्यभागी अनंत अंबानी यांची प्रतिमा रेखाटलेली असून ती वनताराचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे. त्यांच्या शेजारी सिंह आणि वाघ, तर वरच्या भागात हत्तीची प्रतिमा आहे, ज्यावरून घड्याळाचे काटे फिरतात. निसर्ग, शक्ती आणि संरक्षण यांचे प्रतिक म्हणून या प्राण्यांची निवड करण्यात आली आहे. तब्बल २१.९८ कॅरेट वजनाच्या ३९७ रत्नांमध्ये गुंफलेल्या या घड्याळाचे नाव देखील ‘वनतारा’ असे ठेवण्यात आले आहे. या घड्याळाची किंमत अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र काही जाणकारांच्या मते घड्याळाची किंमत सुमारे १.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे १२ कोटी रुपये) इतकी असू शकते.

‘राम जन्मभूमी’ संकल्पनेवर घड्याळ

ब्रँडचे संस्थापक जाकोब अरबो यांनी यापूर्वी ‘राम जन्मभूमी’ या संकल्पनेवर आधारित घड्याळ तयार केले होते. ते घड्याळ अनंत अंबानी, अभिनेता अभिषेक बच्चन यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात हातात घातले होते.