प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीवर अंधेरी कोर्टात आज सुनावणी पार पडली. दरम्यान यावेळी कंगना उपस्थित नसल्याने कोर्टाने संताप व्यक्त केला. इतकंच नाही तर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढू असं स्पष्ट सांगितलं आहे. २० सप्टेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

कंगनावरील कारवाईचे आदेश योग्यच; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेत अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगनाची मागणी उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली होती. कारवाई सुरू करण्याचा महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश बेकायदा नाही, त्यात अनियमितता नाही. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे न्यायालयाने नमूद केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने कंगनाने अंधेरी कोर्टात हजर होणं आवश्यक होतं.

कंगनाला करोनाची लक्षणं आढळली असून करोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप रिपोर्ट आलेला नाही अशी माहिती तिचे वकील रिझवान सिद्दिकी यांच्याकडून देण्यात आली. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला. यावर भारद्वाज यांनी गेल्यावेळीदेखील कंगना पुढील सुनावणीस उपस्थित राहील सांगत गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती याकडे लक्ष वेधलं.

यानंतर सिद्दीकी यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं असल्याची माहिती दिली. हाच डॉक्टर साक्षीदार असून कंगनाने चित्रपट प्रमोशनच्या वेळी अनेक लोकांची भेट घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. भारद्वाज यांनी यावेळी सुनावणीला उशीर होत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. तसंच परवानगी नव्हती तो दिवस वगळता तक्रारदार प्रत्येक सुनावणीला उपस्थित असल्याचं लक्ष वेधलं.

कोर्टाने यावेळी जर कंगना पुढील तारखेस कोर्टात हजर झाली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू असं सांगत खडसावलं. आम्ही अटक वॉरंट अर्ज सध्या प्रलंबित ठेवत असून जर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिली तर अटक वॉरंट काढू असं कोर्टाने म्हटलं. २० सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.