मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पनवेल शहर पोलिसांना हवा असलेला फरुख हमीद शेख ऊर्फ फरुख बटाटा याच्या शोधासाठी सहार पोलिसांनी अंधेरी पूर्वेतील विमानतळाजवळ असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकला. या कारवाईत हॉटेलमधील खोलीतून ४० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच फरुख तेथून पसार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नी असल्याचे सांगणाऱ्या तायबा मोहम्मद फरुख शेख आणि परवीन मोहम्मद फरुख शेख या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फरुख शेख हा पनवेल परिसरातील अमली पदार्थांचा प्रमुख पुरवठादार आहे. तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्याची गोपनीय माहिती सहार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली. हॉटेलच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने खोली क्रमांक १०१८ शोधण्यात आली. खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांना तेथे तीन पुरुष आणि एक महिला आढळले.

त्यांची नावे अब्दुल्ला भिकुल्ला खान (पिंपरी-चिंचवड), अभि बकुलभाई अंबालिया (सुरत), अब्दुल सुबान शमशाद अन्सारी आणि रोशनारा शमशाद अहमद अन्सारी (नायगाव पूर्व) अशी आहेत. खोली फरुख शेख वापरत असल्याचे तेथील उपस्थितांनी पोलिसांना सांगितले. खोलीतील पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ४० लाख रुपयांची रोकड आढळली. ही रक्कम फरुखची असून तो काही वेळापूर्वीच तेथून निघून गेल्याचे उपस्थितांनी सांगितल्याची माहिती आहे.

दरम्यान, तायबा आणि परवीन या दोन महिला दोन पुरुषांसह नंतर हॉटेलमधील खोलीत आल्या. त्यांनी आपण फरुखच्या पत्नी असल्याचे सांगितले. खोलीत सापडलेली रोकड फरुखची असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्यासोबत आलेल्या जफर एम. निजाम शेख आणि राम स्वरूप अग्रवाल यांनी पोलिसांना आपण पोलाद व्यवसायासंदर्भातील व्यवहारासाठी फरुखला भेटायला आल्याचे सांगितले. रोकडबाबत आपल्याला माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला.

जप्त केलेली रोकड अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळालेली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फरुखशी संबंधित असल्याच्या संशयावरून दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या अन्य व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. फरुखचा शोध सुरू असून, या कारवाईत सहार पोलिसांनी जप्त केलेली रोकड आणि संशयितांची माहिती पनवेल शहर पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.