मुंबई : ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरून घाटकोपर – अंधेरीदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ‘मेट्रो १’ मार्गिकेवरून घाटकोपर – अंधेरीदरम्यान कमी अंतराच्या गाड्या चालविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. प्रवाशांची ही मागणी अखेर मान्य झाली असून मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) सोमवार, १० ऑगस्टपासून ‘मेट्रो १’ मार्गिकेवर घाटकोपर – अंधेरीदरम्यान मेट्रो चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून दररोज सायंकाळी कमी अंतराच्या घाटकोपर – अंधेरी मेट्रो धावणार असून, हा प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे. दररोज कमी अंतराच्या आठ फेऱ्या धावणार आहेत.
मुंबईतील पहिली ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिका २०१४ पासून वाहतूक सेवेत आहे. आता ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजघडीला या मार्गिकेवरून सरासरी पाच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. वाढत्या प्रवासी संख्येमुळे या मार्गिकेवरील चार डब्यांच्या मेट्रो गाड्या गर्दीच्या वेळी कमी पडतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांना गर्दीला सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर सहा डब्यांच्या गाड्या चालविण्यासह गर्दीच्या वेळी कमी अंतराच्या घाटकोपर – अंधेरी दरम्यान मेट्रो चालविण्याची मागणी होत होती. दरम्यान, ‘एमएमओपीएल’च्या एका अभ्यासानुसार ‘मेट्रो १’ मार्गिकेवर घाटकोपर – अंधेरीदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या ८८ टक्के आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी घाटकोपर – अंधेरी मेट्रो चालविण्याची मागणी होत होती. या मागणीनुसार एमएमओपीएलने घाटकोपर – अंधेरीदरम्यान दोन वेळा चाचण्या घेतल्या. एप्रिल २०२५ मध्ये काही दिवस घाटकोपर – अंधेरीदरम्यान गाड्या चालविल्या. मात्र, घाटकोपर – अंधेरीदरम्यान कायमस्वरूपी मेट्रो गाड्या धावण्याची प्रवाशांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर आता संपली.
घाटकोपर – अंधेरीदरम्यान सोमवारी सायंकाळपासून मेट्रोच्या आठ गाड्या धावणार असल्याची माहिती ‘एमएमओपीएल’ने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पहिली गाडी सोमवारपासून दररोज सायंकाळी ६.२३ वाजता अंधेरीवरून घाटकोपरसाठी सुटेल. तर शेवटची गाडी रात्री ८.२२ वाजता अंधेरीवरून घाटकोपरसाठी सुटेल. या वाढीव फेऱ्यांमुळे ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील एकूण फेऱ्यांची संख्या आता ४७६ वरून ४८४ अशी होणार आहे. तर गर्दीच्या वेळी या मार्गिकेवरून ३ मिनिटे २० सेकंदांनी गाड्या सुटतील. कमी अंतराच्या या फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
