मुंबई : मिरा – भाईंदरवासियांची मेट्रो प्रवासाची, मेट्रोने थेट अंधेरी गाठण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येणार आहे. दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या काशीगाव – नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान या दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांना मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरुवात केली. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबरमध्ये दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. असे झाल्यास डिसेंबरपासून मिरा-भाईंदरवासियांचा मेट्रो प्रवास सुरू होईलच, पण त्याचवेळी ‘मेट्रो ९’ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागेल आणि मिरा-भाईंदर – अंधेरी दरम्यान मेट्रो प्रवास शक्य होईल.

एमएमआरडीएने १३.५८ किमी लांबीच्या मेट्रो ९ मार्गिकेचे काम दोन टप्प्यात हाती घेतले. या मार्गिकेतील पहिला टप्पा दहिसर – काशीगाव, तर दुसरा टप्पा काशीगाव – सुभाष चंद्र बोस मैदान असाआहे. दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा पूर्ण झाला असून ७ एप्रिल २०२६ ला हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा सेवेत दाखल झाल्याने काशीगाव ते अंधेरी असा मेट्रो प्रवास करता येत आहे. तर सध्या एमएमआरडीएकडून काशीगाव ते नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. या कामाअंतर्गत नुकतेच या टप्प्यावरील विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले. तर स्थानकांचे बांधकामही पूर्णत्वाच्या दिशेने आहे. त्यामुळे दुसरा टप्पा दृष्टिक्षेपात आला आहे. विद्युतीकरण आणि अन्य कामे सुरू झाल्याने आता एमएमआरडीएने या टप्प्याच्या संचालनाच्या दिशेने पहिले आणि मोठे पाऊल उचलले आहे. काशीगाव ते नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान मार्गिकेवर मंगळवारपासून चाचण्यांना सुरुवात केल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दुसऱ्या टप्प्यावरील चाचण्यांना सुरुवात झाल्याने आता हा टप्पा लवकरच सेवेत दाखल होणार आहे. चाचण्या पूर्ण करून या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र घेण्यात येईल. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या टप्प्याच्या संचालनाचा मार्ग मोकळा होईल. या प्रक्रियेसाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल आणि अंधेरी ते मिरा-भाईंदर असा मेट्रो प्रवास करता येईल. मेट्रो ९ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहे.

ही स्थानके सेवेत दाखल होणार

काशीगाव ते मिरा-भाईंदर टप्पा डिसेंबरमध्ये सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात साई बाबा नगर, मेदतीया नगर, शहीद भगतसिंग गार्डन (भाईंदर पश्चिम) आणि सुभाष चंद्र बोस मैदान अशी चार मेट्रो स्थानके आहेत. दुसरा टप्पा सुरू झाल्यास या चार स्थानकांवरून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. लोकलच्या गर्दीतून, वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार असून गारेगाव आणि अतिजलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.