मुंबई: अंधेरीचे सेव्हनहिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. मुंबई महानगरपालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेऊन चालवावे, आणि वैद्यकीय, नर्सिंग आणि संशोधन सुविधांसह त्याचा एम्स (AIIMS) पातळीच्या संस्थेत विकास करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
अंधेरीचे सेव्हनहिल्स रुग्णालय उद्योगपतीच्या घशात घालण्याचे षडयंत्र दिसत असून कोणत्याही परिस्थितीत या रुग्णालयाचे खाजगीकरण करू नये. मुंबईकरांना चांगल्या व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेऊन चालवावे, आणि वैद्यकीय, नर्सिंग आणि संशोधन सुविधांसह त्याचा एम्स (AIIMS) पातळीच्या संस्थेत विकास करावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली आहे.
अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णलयाची सरकारी मूल्यानुसार ५ हजार कोटी तर बाजार भावानुसार ७ हजार कोटी रुपये किंमत आहे. एनसीएलटी प्रक्रियेअंतर्गत झालेल्या समझोत्यानंतर हे रुग्णालय एका बड्या उद्योगपतीशी संबंधित असलेल्या खाजगी कॉर्पोरेट संस्थेकडे सोपवले जाऊ शकते, असा आरोप आझमी यांनी केला आहे. जर खाजगी अधिग्रहणासाठी ४७६ कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात, तर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी हे रुग्णालय ताब्यात घेण्यासाठी तीच रक्कम का वापरू शकत नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे. मुंबईत रुग्णालयांची कमतरता असताना कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर करु नये, अशीही मागणी आझमी यांनी केली आहे.
हे रुग्णालय सार्वजनिक जमिनीवर उभे आहे, १५०० खाटा, ३६ ऑपरेशन थिएटर्स, १२० बाह्यरुग्ण विभाग आहेत आणि तरीही, गरीब जनतेची सेवा करण्याऐवजी, ते खाजगी नियंत्रणाखाली उभे केले जात आहे. सेव्हन हिल्सच्या हस्तांतरणाची घाई का केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांसाठी काम करत आहे की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी? मुंबईत एका अद्ययावत रुग्णालयाची गरज आहे, मुंबईतील सरकारी व पालिकेच्या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना खाटांसाठी धावपळ करावी लागते अशावेळी एक अद्ययावत जागतिक दर्जाचे रुग्णालय खाजगी लोकांच्या घशात का घातले जात आहे असा आरोप अशरफ आझमी यांनी केला आहे.
सेव्हन हिल्स रुग्णालयाबरोबरच भगवती, शताब्दी रुग्णालयाच्या खाजगीकरणाचाही घाट घातला जात आहे तो हाणून पाडू, असा इशारा आझमी यांनी दिला आहे.
