मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२वरून जवळच्या अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा चालकांच्या मनमानीचा सामना करावा लागत आहे. रिक्षासाठीच्या अधिकृत रांगेतूनही अंधेरी, विलेपार्ले, खार यांसारख्या जवळच्या ठिकाणी जाण्यास चालक नकार देतात. मीटरप्रमाणे न जाता प्रवाशांकडे मनमानी व अव्वाच्या सव्वा भाड्याची मागणी करतात. तर बोरीवलीपर्यतच्या अंतरासाठी ३५० ते ५०० रुपयांपर्यंतची मागणी करतात. यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई विमानतळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. दररोज सुमारे १ हजार विमानांद्वारे दीड ते पावणे दोन लाख प्रवासी ये-जा करतात. रात्री-अपरात्री-पहाटेच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह दिवसा देखील प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जाते. मात्र अनेक प्रवासी पोलिसांकडे तक्रार दाखल न करता सोशल मिडियावर आपला अनुभव मांडतात. रीतसर तक्रार दाखल नसल्याने पोलिसांना देखील तपास करणे अवघड होते. जादा भाडे आकारणे, मीटरमध्ये फेरफारासह प्रवाशांना बनावट टॅक्सी- रिक्षा ॲपच्या माध्यमातून लुबाडण्यात येत आहे. टर्मिनल-२वरून अंधेरी स्थानकाकडे जाणाऱ्या एका प्रवाशाने गेल्या आठवड्यात अधिकृत रिक्षा रांगेतून रिक्षा घेतली. अंधेरी स्थानक असे सांगितल्यानंतर चालकाने १५० रुपये भाडे सांगितले.
मीटरनुसार भाडे देण्याची तयारी दर्शविल्यावर ‘मीटर सुरू नाही’, असे सांगण्यात आले. याच प्रवाशाने अंधेरी स्थानक पूर्व ते टर्मिनल-२ असा प्रवास करताना ९३ रुपये भाडे दिले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर चेंबुरच्या एका चालकाने विमानतळावर रिक्शा चालकांना ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. त्यामुळे जादा भाडे आकारले जाते, असा दावा केला. मात्र, या ५० रुपयांच्या दाव्याची कोणताही पुरावा नाही. त्यामुळे अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्याचे स्पष्ट होते.
‘टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा’ हवाई प्रवाशांना रिक्शा चालकांबाबत अडचण,तक्रार असल्यास १८००२२०११० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. प्रवाशांच्या तक्रारीनंतर कारवाई केली जाते. तसेच चालकाला नोटीसही जाते. हा टोल फ्री क्रमांक २४ x ७ सुरू असतो. पोलीस प्रवाशांच्या तक्रारींनुसार कारवाई केली जाते. नियमित कारवाईत परवाना नसलेल्या किंवा बेकायदेशीर चालकांवर कारवाई होते. मात्र आजही अनेक प्रवासी रीतसर तक्रार दाखल करीत नाहीत. प्रवाशांनी पोलिस स्थानकात रीतसर तक्रार नोंदवावी.
