मुंबई: दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी, उद्योजकांसाठी आणि प्रवाशांसाठी लवकरच एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मार्गिकेतील अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावर अत्याधुनिक असे पॉड हॉटेल (कॅप्सूल हॉटेल) विकसित केले जात असून महिन्याभरात हे हॉटेल सुरू होणार आहे. त्यामुळे महिन्याभराने पर्यटकांना, उद्योजकांना, मुंबईबाहेरून कामानिमित्त आलेल्यांना मेट्रो स्थानकातच विश्रांतीसाठीची जागा उपलब्ध होणार आहे. इतकेच नव्हे तर रात्रीच्या मुक्काम या हॉटेलमध्ये करता येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्पातील मेट्रो २ अ मार्गिकेसह दहिसर ते गुंदवली मेट्रो ७, दहिसर ते काशीगाव मेट्रो ९ टप्पा १, मंडाले ते चेंबूर मेट्रो २ ब टप्पा १ अशा चार मेट्रो मार्गिका सेवेत आहेत. या मार्गिकेवरील तिकीट विक्रीशिवाय इतर पर्यायाद्वारेही महसूल मिळावा यासाठी एमएमआरडीएने विविध संकल्पना पुढे आणल्या आहेत. त्यानुसार मेट्रो स्थानकातील जागा भाडेतत्त्वाने दुकानदारांना, कंपन्यांना दिल्या जातात. त्यानुसार आतापर्यंत काही जागा वितरित करण्यात आल्या असून बऱ्यापैकी दुकाने सुरू झाली आहेत. तर लवकरच मेट्रो स्थानकात मॅकडॉनल्ड्सही सुरू होणार आहे. तर अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावरील मेट्रो बुक्स प्रवाशांच्या पसंतीस पडत आहे. या पुस्तकाच्या दुकानात ९९ ते १५० रुपयांत पुस्तक खरेदी करता येते. परवडणाऱ्या दरात पुस्तके मिळत असल्याने या दुकानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आता या चारही मार्गिकेवरील आणखी जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी एमएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया सुरू आहे. या निविदेनुसार आणखी ५२७ दुकाने चार मार्गिकांवरील मेट्रो स्थानक परिसरात सुरू होणार आहेत. अशात सध्या चर्चा आहे ती म्हणजे अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावर लवकरच सुरू होणाऱ्या पॉड हॉटेलची.
पॉड हॉटेल क्षेत्रातील स्नूझ हाऊस कंपनीकडून अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकात पॉड हॉटेल विकसित केले जात आहे. या हॉटेलचे काम अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात हे हॉटेल सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या पॉड हॉटेलमध्ये विश्रांतीची सोय असणार असून येथे राहता येईल, मुक्काम करता येईल. राहण्यासाठीची सर्व सुविधा यात उपलब्ध असणार असून याचा फायदा नोकरदार, व्यावसायिक आणि प्रवाशांना होणार आहे. अंधेरीसारख्या मध्यवर्ती, महत्त्वाच्या ठिकाणी मेट्रो स्थानकावर एक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
