मुंबई : विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी २३ सप्टेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले, तर २६ सप्टेंबर रोजी राज्यभरात स्वत:ला अटक करून घेत अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन केले. त्यानंतरही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने येत्या १ ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
हेही वाचा >>> गुजरातमधील व्यापाऱ्याचे ६८ लाख रुपये घेऊन नोकराचे पलायन
मानधन वाढ, उपदान (ग्रॅच्युइटी) व मासिक निवृत्ती वेतन या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २३ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महिला व बालविकास मंत्री यांनी २४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी २६ सप्टेंबर रोजी वित्त मंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे, तसेच तातडीने हा विषय मंत्रिमंडळात मांडून त्यावर मंजूर घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. महिला व बालविकास मंत्र्यांच्या विनंतीवरून उपोषणाचे रुपांतर बेमुदत धरणे आंदोलनात करण्यात आले. त्यानुसार २६ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविका धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत. मंत्रिमंडळामध्ये मागण्या मन्य होऊन शासन आदेश काढण्यात येत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक : कथित बनावट निवडणूक प्रतिनिधीच्या उपस्थितीविरोधात अभाविप उच्च न्यायालयात
बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन, जेल भरो आंदोलन करूनही सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत शासनाने मानधन वाढ, उपदान व निवृत्ती वेतनाबाबतचा निर्णय न घेतल्यास १ ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील, असा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती समितीचे सहनिमंत्रक राजेश सिंह यांनी दिली.
मानधन वाढ, दरमहा पेंन्शन, ग्रॅच्युइटी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच ५२ दिवसांचा राज्यव्यापी संप केला. त्यानंतर आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली. त्यानंतर तात्काळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले होते. आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा पाच हजारांची वाढ करण्याचा निर्णय १४ मार्च २०२४ रोजी घेतला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये आशा कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधनवाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.