scorecardresearch

अंगणवाडी सेविकांचा २० फेब्रुवारीपासून संप 

सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येतात. मात्र अंगणवाडी सेविकांच्या साध्या मागण्या पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे

अंगणवाडी सेविकांचा २० फेब्रुवारीपासून संप 
अंगणवाडी सेविका (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : मानधन, अंगणवाडय़ांचे भाडे, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळी सुट्टय़ा बंद, नवीन मोबाइलसाठी आंदोलन करूनही दखल नाही, सदोष ट्रॅकर अ‍ॅप, अशा समस्या वारंवार मांडूनही शासनाने दखल न घेतल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येतात. मात्र अंगणवाडी सेविकांच्या साध्या मागण्या पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मानधनामध्ये साडेपाच वर्षांपूर्वी तर केंद्र सरकारकडून साडेचार वर्षांपूर्वी मानधनामध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मानधनासह अन्य मागण्यांसाठी आता अंगणवाडी सेविकांनी अटीतटीची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिला आहे.

२० फेब्रुवारीपासून अंगणवाडय़ांचे कामकाज बंद ठेवण्यात येईल. पोषण ट्रॅकर भरणार नाही, अहवाल आणि माहिती देणार नाही, असा निर्णय घेऊन आता रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटी यांनी दिली.

अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारताना राज्य सरकार आणि प्रशासनाला १ फेब्रुवारीला नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व जिल्हा परिषदा आणि प्रकल्प कार्यालयांना मोर्चा काढून नोटीस दिली जाईल. प्रकल्प, जिल्हा, राज्य स्तरावर सातत्याने आंदोलने करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृती समितीकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 05:28 IST
ताज्या बातम्या