मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी मंत्रालयात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आज मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी पुकारलेला एकदिवसीय लाक्षणिक संप तसेच आझाद मैदानावर काढण्यात येणारा मोर्चा मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावरील आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या वेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव उपस्थित होते.

बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. शासनाने मागण्यांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर संघटनेने ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला प्रस्तावित संप आणि आझाद मैदानावरील मोर्चा मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अंगणवाडी सेवा सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला असून, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन आणि संघटनेदरम्यान पुढील काळात होणाऱ्या चर्चेला महत्त्व आहे.