मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने ६ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर दुपारी २ वाजता अंगणवाडी कर्मचारी शक्तिप्रदर्शन आणि जेल भरो आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे चिटणीस राजेश सिंह यांनी आहे.
राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी केंद्रात सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून दरदिवशी ६ महिने ते ६ वर्षे बालकांना पूरक पोषण आहार, अनौपचारिक शिक्षण, तसेच गरोदर व स्तनदा मातांना आहार व आरोग्य सेवेचे फायदे देण्याचे महत्वाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.
त्याव्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक संबधी, मातृवंदना योजना, लेक लाडकी योजना, लाडकी बहिण योजना, घरकुल योजना, दिव्यांग बालकांचे सर्वेक्षण इत्यादी योजनाबाहय कामे दिली जातात. गेल्या ५१ वर्षापासून तळागाळातील लाभार्थ्यांना सेवेचे फायदे देण्याचे अविरत कार्य अंगणवाडी कर्मचारी करीत आहेत. दरदिवशी ८ ते १० तास काम करूनसुध्दा, शासन त्यांना शासकीय कर्मचारी समजत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटीचा लाभ देण्यात यावा. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबत अनेक वेळा बैठका होऊनही सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅच्युइटीबाबत शासनाने अद्याप ठोस आदेश काढले नाहीत. त्याचप्रमाणे ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश असतानाही सुमारे ४० टक्के अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मानधनात वर्ग करून ती दरमहा देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन तृतीय व चतुर्थ श्रेणीतील वेतन व भत्ते देण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी एकदिवसीय संप पुकारणार आहेत. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन आणि जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे चिटणीस राजेश सिंह यांनी सांगितले.
