– संदीप आचार्य

महाराष्ट्रातील जवळपास सत्तर लाख बालकांच्या पोषण आहारापासून विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविका या ग्रामीण बाल आरोग्याचा कणा असून मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यासाठी जवळपास दहा हजार अंगणवाडी सेविका नववर्षात येत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयांतीदिनी तीन जानेवारी रोजी आझाद मैदानावर सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा लावून बेमुदत आंदोलन करणार आहेत. आश्वासने देण्यापलीकडे सरकारने आजपर्यंत काहीही केले नसल्याने ठोस निर्णय होईपर्यंत आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचे हे एल्गार आंदोलन चालविले जाणार आहे.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
nagpur, truck driver kidnapped minor girl, police, solved case
ट्रक चालकांकडून अल्पवयीन; मुलीचे अपहरण, तीन तासांत छडा
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

राज्यातील ९७ हजार अंगणवाड्या तसेच १३ हजार मिनी अंगणवाड्यांमधून दोन लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका व अन्य कर्मचारी शून्य ते सहा वयोगटातील जवळपास ७० लाखाहून अधिक बालकांना पोषण आहार देणे, माता आरोग्याची जपणूक, या बालकांचे वजन-उंची आदींची नोंद करणे तसेच तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी बालवाडी चालविण्याचे काम करत असतात. या अंगणवाडी सेविकांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे साडेआठ हजार रुपये मानधन देण्यात येत असून अंगणवाड्यांचे अत्यल्प भाडे, तेथील अपुऱ्या सोयी-सुविधा, बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपुरे प्रशिक्षण, नवीन कार्यक्षम मोबाइल न देता पोषण ट्रॅकर ॲप चालविण्याची सक्ती करणे अशा अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने सुमारे १० हजार अंगणवाडी सेविका मुंबईतील आझाद मैदानावर येत्या ३ जानेवारीपासून बेमुदत एल्गार करणार आहेत. यावेळी सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा धारण करून हे आंदोलन करण्यात येणार असून जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: आझाद मैदानावर येऊन ठोस आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालत राहील असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई: प्रवासातील गैरवर्तवणुकीवर ‘बॉडी कॅमेऱ्या’ची करडी नजर; मध्य रेल्वे सुरक्षा दलाला मिळणार ४० बॉडी कॅमेरे

विरोधी पक्षात असताना २०१४ पूर्वी अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या वेळी तत्कालिन भाजप नेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांनी आमच्या व्यासपीठावर येऊन अंगणवाडी सेविकांना २० हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली होती. मात्र मुख्यमंत्री बनल्यानंतर फडणवीस यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. युती शासनाच्या काळात आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस व महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दीड हजार रुपये मानधन वाढीची घोषणा केली. मात्र त्याच अंमलबजावणी काही केली नव्हती, असेही एम. ए. पाटील म्हणाले. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी एकदा प्रत्यक्ष बैठक झाली तर एकदा व्हिडिओ कॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. मानधनवाढचा प्रश्न विचाराधीन असल्याचे लोढा यांनी यावेळी सांगितले होते. हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मानधनवाढीची घोषणा होईल अशी आमची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्यामुळे सरकारविरोधात एल्गार पुकारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही.

सरकारने २०१९ रोजी एक लाख अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिला होता. त्याचा वॉरंटी कालावधी दोन वर्षांचा म्हणजे मे २०२१ पर्यंत होती. हे मोबाइल चांगल्या प्रतीचे नव्हते. त्याचे रॅम कमी तसेच ते वारंवार हँग होत असतानाही लाखो बालकांच्या सविस्तर नोंदी या मोबाइलच्या माध्यमातून करण्याची जबरदस्ती महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. गंभीर बाब म्हणजे मोबाइल नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीचा खर्चही अंगणवाडी सेविकांच्या मानधनातून वसूल केला जातो. या पार्श्वभूमीवर सरकारने २०२१ पासून अंगणवाडी सेविकांना इंग्रजी पोषण ट्रॅक ॲप दिले. बहुतेक अंगणवाडी सेविकांना इंग्रजी येत नसल्यामुळे मराठीत हे ॲप देण्यात यावे अशी मागणी वारंवार करूनही ते दिले जात नाही. परिणामी योग्य नोंद न झाल्यास अंगणवाडीतील बालकांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत असल्याचे या अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा? दोन्ही गट आमनेसामने

राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाड्यांमधील अंगणवाडीसेविकांची ४०४२ पदे रिक्त आहेत तर मदतनीसांची १२,२६७ पदे भरलेली नाहीत. याशिवाय १००० पर्यवेक्षकांची पदेही रिक्त आहेत. याचा फटका बालकांना, गर्भवती व स्तनदा मातांना बसतो. यातूनच बालकांची योग्य काळजी घेणे शक्य होत नसल्यामुळे कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढताना दिसते असे अंगणवाडी सेविकांच्या नेत्या शुभा शमीम यांनी सांगितले. शून्य ते सहा वोयगटाच्या सर्वसामान्य बालकांना ८ रुपयांत सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण हे पोषण आहार म्हणून द्यावे अशी सरकारची भूमिका आहे. आता आठ रुपयात वडापाव किंवा चहा तरी मिळतो का, असा सवाल शुभा शमीम यांनी केला आहे. अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यंचा आहार शिजवण्यासाठी प्रती लाभार्थी ६५ पैसे दिले जातात. एवढ्या कमी पैशात महिला व बालविकासमंत्री लोढा हे आहार शिजवून दाखवतील का, असा जळजळीत सवालही अंगणवाडी सेविकांनी केला आहे. राज्यात सुमारे १३ हजार मिनी अंगणवाडी असून याठिकाणी अंगणवाडी सेविकांना मदतनीस दिले जात नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा फटका प्रामुख्याने या ठिकाणी येणाऱ्या बालकांना बसत असल्याचे सांगण्यात येते. महानगर क्षेत्रा अंगणवाड्यांसाठी सहा हजार रुपये भाडे तर महापालिका क्षेत्रात चार हजार रुपये भाडे देण्याचे सरकारचे धोरण असून एवढ्या कमी पैशात सर्व सोयी असलेल्या अंगणवाड्या आम्हाला मिळवून द्या, असे आवाहनही या अंगणवाडी सेविकांनी केले आहे.

सरकारला दोन लाख अगंणवाडी सेविकांच्या कामाची किमंत नाही की या अंगणवाड्यांमधील सत्तर लाख बालकांच्या आरोग्याची व पोषण आहाराची चिंता नसल्यानेच आम्हाल सावित्रीबाई फुले जयंतीचे निमित्त साधून आझाद मैदानावर न्यायासाठी एल्गार पुकारावा लागल्याचे एम. ए. पाटील यांनी सांगितले.