अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार प्रकरण

मुंबई: अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने समन्स बजावले आहे. याप्रकरणी साक्षीदार म्हणून त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. याप्रकरणात अधिक माहिती घेण्यासाठी दोघांनाही बोलवण्यात आल्याचे समजतेय.

 संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अधिकाऱ्यांनी सीबीआयसोबत चर्चा केली होती. त्यामुळे सीबीआयला जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात येण्याची विनंती दोन्ही अधिकाऱ्यांनी केली आहे.

सीबीआयने एप्रिल महिन्यात याप्रकरणी विविध कायद्यांनुसार अंतर्गत अनिल देशमुख  आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.  सरकारी पदावर असताना त्याचा गैरवापर केल्याचा ठपका एफआयआरमध्ये ठेवण्यात आला आहे. सीबीआयचे  नवी दिल्लीतील उपअधिक्षक आर.एस.गुंजीयाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.  तक्रारीनुसार, सरकारी पदावर असताना त्याचा गैरवापर झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच वाझेला पोलिस सेवेत घेणे व त्यानंतर संवेदनशील गुन्ह्यांचा तपासही त्याला देण्यात आला. हे देशमुख यांच्या माहितीत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कडून मिळालेल्या माहितीवरून तत्कालीन गृहमंत्री व इतर व्यक्तींचा बदली व नियुक्तीवर प्रभाव होता, असेही तक्रारीत नमूद केले आहे.