मुंबई : शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेपाठोपाठ दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथविधीनाट्यात सहभागी होऊन पुन्हा महाविकास आघाडीत परतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने टांच आणली. त्यातच भाजप सरकारच्या काळात मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले आणि निवृत्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांच्या मंत्रालयाजवळील इमारतीतील सदनिकेवरही प्राप्तिकर विभागाने टांच आणली आहे. या कारवायांमुळे केंद्र-राज्य संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत.

अनिल देशमुख यांना अटक; शनिवारपर्यंत ‘ईडी’ कोठडी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी मध्यरात्री अटक केल्यानंतर त्यांना मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.

माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंह यांनी केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपप्रकरणी ‘ईडी’ तपास करत आहे. या प्रकरणी देशमुख हे त्यांच्या वकिलासह सोमवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी ‘ईडी’च्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाले होते. दिवसभर ‘ईडी’ने त्यांचा जबाब नोंदवला. रात्री साडेआठच्या सुमारास ‘ईडी’चे सहसंचालक सत्यव्रत कुमार दिल्लीवरून मुंबईतील ‘ईडी’ कार्यालयात दाखल झाले. त्यांनी देशमुख यांची चौकशी केली. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा देशमुख यांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी मंगळवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली. ‘ईडी’ची बाजू मांडणारे अतिरिक्त महान्याय अभिकता अनिल सिंह यांनी देशमुख यांना १४ दिवस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. पैशांचा माग काढण्यासाठी देशमुख यांच्या चौकशीची आवश्यकता असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. देशमुख यांच्या वतीने अ‍ॅड. विक्रम चौधरी व अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी देशमुख यांच्या कोठडीला विरोध केला.

प्रकरण काय?

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ एप्रिलला याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याच्या आधारावर ११ मे रोजी ‘ईडी’ने याप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने बारमालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये चार कोटी ७० लाख रुपये जमा केले होते. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोन हप्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. बारमालकांकडून घेतलेली चार कोटी ७० लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. याप्रकरणी देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित चार कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ‘ईडी’ने टांच आणली होती. ‘ईडी’ने देशमुख व कुटुंबीयांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नियंत्रण असलेल्या २७ कंपन्यांची ओळख पटवली आहे. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय साहाय्यक कुंदन शिंदे यांना २६ जूनला अटक केली होती.