मुंबई : आर्थिक गैरव्यवहार किं वा बेनामी मालमत्ताप्रकरणी अटक वा शिक्षा झालेले अनिल देशमुख हे अलीकडच्या काळातील राज्यातील  आठवे नेते आहेत. गैरव्यवहारांचे आरोप अनेक नेत्यांवर झाले. भ्रष्टाचार किं वा गैरव्यवहारांच्या आरोपांवरून बॅ. ए. आर. अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण या मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते. पण गैरव्यवहारांवरून आतापर्यंत  सात नेत्यांना अटक झाली आहे.

महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. सुमारे दोन वर्षे भुजबळ हे तुरुंगात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर के लेल्या आरोपपत्रात कनिष्ठ न्यायालयात छगन भुजबळ यांची अलीकडेच निर्दोष मुक्तता झाली. ईडीचे प्रकरण अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. १०० कोटींच्या खंडणीच्या आरोपांवरून अटक झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचेच. आतापर्यंत भुजबळ आणि देशमुख या दोन राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांना अटक झाली आहे. गेल्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश के लेले भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही पुण्यातील जमीन गैरव्यवहारप्रकरणी सध्या ईडी कार्यालय व न्यायालयात खेटे घालावे लागत आहेत.

तीन माजी गृहमंत्री तुरुंगात

गृहमंत्रीपद भूषविलेले छगन भुजबळ, डॉ. पद्मासिंह पाटील आणि अनिल देशमुख या तिघांना गैरव्यवहार किं वा खुनाच्या आरोपात अटक झाली. तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. यापैकी डॉ. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकला  होता.

अटक वा शिक्षा झालेले अन्य नेते

बबन घोलप – शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातील सामाजिक  न्यायमंत्र्यांना बेनामी मालमत्ताप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती.

सुरूपसिंह नाईक – जंगलात  लाकू ड वखारीला बेकायदेशीरपणे परवानगी दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महिनाभराची शिक्षा ठोठावली होती.

सुरेश जैन – जळगाव घरकु ल घोटाळ्यात तुरुंगवास.

सुनील के दार – नागपूर जिल्हा बँके तील होमट्रेड घोटाळ्यात अटक झाली होती.

गुलबराव देवकर – जळगाव घरकु ल घोटाळ्यात अटक.

डॉ. पद्मासिंह पाटील – पवनराजे निंबाळकर खून खटल्यात अटक.

आता अनिल परब  यांच्यावर कारवाई-सोमय्या

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व कुटुंबीयांच्या मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाने टाच आणली, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली, आता परिवहन मंत्री अनिल परब आणि अन्य मंत्री व नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.