मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडचणीत सापडलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. देशमुख यांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने ईडीने त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी अनिल देशमुख यांनी न्यायालयात न्यायाधीशांना लेखी पत्र दिले आहे. “ईडीने मला १० दिवसांपासून कोठडीत ठेवले आहे. या काळात मला २००हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. मात्र जे ईडीला अपेक्षित आहे, त्यासंदर्भात माझ्याकडे आता सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे मला आता ईडीची कोठडी दिली जाऊ नये,” असं त्यांनी म्हटलंय.
या प्रकरणी सचिन वाझेची कस्टडी घेण्याचा प्रयत्न असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. दोघांची समोरासमोर चौकशी करायची असल्याने अनिल देशमुखच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडीने कोर्टात केली आहे. तर, अनिल देशमुख यांच्या कौन्सिलचे विक्रम चौधरी यांनी कोठडी वाढविण्यास विरोध केला. त्यांनी सांगितले की, “सचिन वाझेची कस्टडी घेतल्यानंतर दोघांची समोरासमोर चौकशी करता येईल. गरज पडल्यास त्यावेळी अनिल देशमुखांची कोठडीही नंतर न्यायालयाच्या परवानगीने घेता येईल. सचिन वाझे सध्या पोलीस कोठडीत आहे, उद्या त्याची रिमांड वाढवली तर?,” असा सवाल विक्रम चौधरी यांनी केला.




दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सत्र न्यायालयात पोहोचल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. कोर्ट रूमच्या बाहेर फक्त दोघांनी एकमेकांकडे बघून हात जोडून नमस्कार केला.