महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरांवर आज ईडीनं सकाळी छापा टाकला. यामध्ये अनिल देशमुख यांची सविस्तर चौकशी केल्यानंतर संध्याकाळी अनिल देशमुख यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सीबीआय, ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ईडीचे अधिकारी आज चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांना पूर्ण सहकार्य केलं. पुढील काळातही करू”, असं ते म्हणाले. तसेच, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर केले. ते पोलीस आयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवलं”, या आपल्या भूमिकेचा देखील अनिल देशमुख यांनी पुनरुच्चार केला आहे.

…म्हणून परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद!

दरम्यान, यावेळी बोलताना अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची भूमिका आपल्याला नेमकी संशयास्पद का वाटली, याविषयी देखील भाष्य केलं आहे. “परमबीर सिंह आयुक्त असताना प्रामुख्याने मुकेश अंबांनींच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्यात आलं. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यात एपीआय सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे, प्रकाश धुमाळ सुनील माने असे पाच पोलीस हे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सीआययू विभागात कामाला होते. ते सगळे परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते. शासनाला माहिती मिळाली की हे सगळे सगळे या प्रकरणात गुंतले आहेत, तेव्हा परमबीर सिंह यांची आयुक्त म्हणून भूमिका संशयास्पद होती”, असं देशमुख यावेळी म्हणाले.

चौकशीतून सत्य समोर येईलच!

“अंबानींच्या घराबाहेरची स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. हे अधिकारी तुरुंगात आहेत. अशा संशयास्पद भूमिकेमुळेच त्यांची बदली केली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. सीबीआय नियमानुसार त्याची चौकशी करत आहे. त्यातून सत्य जनतेसमोर येईलच. सीबीआय, ईडीला माझ्याकडून संपूर्ण सहकार्य राहील”, असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

 

नागपुरातील निवासस्थानी छापा

शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे. त्यापाठोपाठ मुंबईतल्या वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही ED ने छापा टाकला.

अनिल देशमुखांच्या घरांवर ‘ईडी’च्या छापेमारीबाबत फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवार म्हणतात, “ED ची आम्हाला चिंता नाही”

दरम्यान, अनिल देशमुखांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.