मुंबई : वांद्रेस्थित ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय बेकायदा ठरवून ते जमीनदोस्त केल्याप्रकरणी महापालिका अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपातून शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांच्यासह दहा जणांची सत्र न्यायालयाने बुधवारी पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिेलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी या प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला होता.
अनिल परब यांच्यासह संतोष कदम, सदा परब, उदय दळवी, हाजी अलीम खान आणि अन्य सहाजणांविरूद्ध महापालिका अभियंत्याला मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी खटला चालवण्यात आला. याप्रकरणी माजी नगरसेवक सदानंद कदम यांना अटक होताच आपली अटक टाळण्यासाठी अनिल परब यांच्यासह अन्य सहा आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचा अर्ज ३० जून २०२३ मध्ये न्यायालयाने स्वीकारला होता आणि त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.
दरम्यान, जबाब नोंदवताना, घटना घडली तेव्हा आपण तिथे उपस्थितच नव्हतो, त्यामुळे आपण महापालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा परब यांच्या वतीने केला होता. त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. तसेच, परब आणि अन्य आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात पोलीस अयपशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी सर्व आरोपींची त्यांच्यावरील आरोपातून निर्दोष सुटका केली.
प्रकरण काय ?
पोलिसांच्या आरोपांनुसार, जून २०२३ मध्ये वांद्रेस्थित ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय महापालिकेने अनधिकृत ठरवून जमिनदोस्त केले. त्या निषेधार्थ अनिल परब यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता. परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ एच-पूर्व प्रभागाच्या अधिकारी स्वप्ना क्षीरसागर यांना भेटण्यासाठी कार्यालयात पोहोचले होते.
तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही आमचे पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करणारे महापालिका अधिकारी कोण ? अशी विचारणा परब आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा, काही कर्मचारी पुढे आले असता कार्यकर्त्यांनी महापालिका सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्यावर हल्ला करून त्यांना धमकी दिली, याप्रकरणी महापालिकेच्या वतीने पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळला आणणे, महापालिका अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली वाकोला पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नोंदवला होता.
