मुंबई : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्तेकामांच्या २२७० कोटींच्या निविदांमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आज शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. कंत्राटदारांनी १६ कंत्राटदारांची ‘रिंग’ तयार करून हा घोटाळा केल्याचे सांगत त्यांनी पुरावेच सादर केले. ‘संपूर्ण महाराष्ट्र लुटत आहात, पण किमान देवाला तरी सोडा,’ असा सणसणीत टोला त्यांनी सत्त्ताधाऱ्यांना लगावताना याची उच्चस्तरीय चाैकशीची मागणी केली.

विधान परिषदेत नियम २६० च्या प्रस्तावावर बोलताना अनिल पराब यांनी निविदा प्रक्रियेतील घोटाळ्यात मुख्य अभियंता प्रशांत अवटी आणि ‘हर कन्स्ट्रक्शन’चे विलास बिरारी यांनी मिळून १६ कंपन्यांची ‘रिंग’ तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. २०१८ च्या शासन निर्णयानुसार, एखादा कंत्राटदार एका निविदेत पात्र ठरला, तर त्याला दुसर्या निविदेत अपात्र ठरवता येत नाही. मात्र, मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवल्याचा आरोपही त्यांनी केला.

कंत्राटदारांकडून अजून कामे पूर्णही झालेली नसताना रस्त्यांना तडे गेले आहेत. आणखी १३०० कोटींचे रस्त्यांचे टेंडर येणे बाकी आहे. हा भ्रष्टाचार वेळीच रोखणे गरजेचे आहे. ज्यांना रस्त्याच्या कामात संधी मिळाली नाही, त्यांना रिंग रोडच्या टेंडरमध्ये संधी दिली गेली, असा आरोप परब यांनी केला.

पात्र-आपत्रतेचा खेळ

  • एस. एम. अवताडे कंपनी: १३१.७३ कोटींच्या कामात पात्र, तर ७३.२७ कोटींच्या कामात हेतुपुरस्सर अपात्र.
  • बी. आर. भदाने बीटकॉन कंपनी: ३४.५ कोटींच्या कामात पात्र, तर २६.१९ कोटींच्या कामात अपात्र.
  • फॉरकॉन इन्फ्रा : ३६.४० कोटींच्या कामात पात्र, तर २६ कोटींच्या कामात अपात्र.

देवाच्या पैशाची लूट होणार नाही

अनिल परब यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देवाच्या नावावर पैशांची लूट होऊ नये. देवाभाऊंच्या राज्यात असे होणार नाही आणि आम्ही ते होऊही देणार नाही, असे आश्वासन दिले. कोणत्याही प्रकारचे कार्टेल सरकार खपवून घेणार नाही. जर कुठे कार्टेल आढळले तर ते शंभर टक्के मोडून काढले जाईल, असे ते म्हणाले.