राज्याचे परिवहन आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशन नागपूरला न घेण्याचं काही विशेष कारण आहे का? या प्रश्नालाही उत्तर दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नाही. त्यांना काही दिवस उड्डान करण्यास डॉक्टरांनी परवानगी नाकारलीय आणि मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाला हजर राहायचं आहे. त्यामुळे हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला घेत असल्याचं मत व्यक्त केलं.

अनिल परब म्हणाले, “यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नाही. त्यांना डॉक्टरांनी काही दिवस तरी उड्डान करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यांना स्वतःला या अधिवेशनात उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे अधिवेशन मुंबईत घेण्याचं ठरलं आहे. आगामी अधिवेशनांपैकी कोणतं अधिवेशन नागपूरला घ्यायचं याची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.”

“अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही त्यावर चर्चा होईल”

“अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी २४ डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक घेण्याचं ठरलं आहे. त्यात अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही त्यावर चर्चा होईल. विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी केलीय. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आता फक्त अधिकाऱ्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ,” असं अनिल परब यांनी सांगितलं.

“प्रत्येकजण एसटी आंदोलनावर स्वार होण्याचा प्रयत्न करतोय”

एसटी संपावर बोलताना अनिल परब म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व कोण करतंय याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आम्हाला कामगारांशी देणंघेणं आहे. कामगारांची दिशाभूल होऊ नये असं वाटतं. प्रत्येकजण एसटी आंदोलनावर स्वार होण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांनी त्यांना सरकारची कृती योग्य असल्याचं लक्षात येतं. त्यानंतर ते माघार घेतात. परंतु या दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं जे नुकसान होतंय त्याची जबाबदारी कोणताही नेता घेत नाहीये.”

हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार? राज्य सरकारनं कामगारांना दिला ‘हा’ पर्याय!

“जो नेता एसटी आंदोलनाची जबाबदारी घेतोय त्याने कामगारांच्या नुकसानाची देखील जबाबदारी घेतली पाहिजे. मात्र, असं करताना कुणी दिसत नाहीये,” असंही त्यांनी नमूद केलं.