मुंबई : तरूण मुलींची पिळवणूक करणाऱ्या डान्सबारना अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने नवे सुधारणा विधेयक आणायचे ठरविले असले तरी ‘मंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतात. त्यांच्यावर कारवाई कधी करणार, अशी विचारणा करणारे वक्तव्य शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी केल्याने विधान परिषदेत गुरूवारी चांगलाच गदारोळ झाला.

सदस्य डान्स बारवर रंगून बोलतात…

मनोरंजनाच्या नावाखाली चालविले जाणारे डान्सबार बंद करण्याकरिता हे विधेयक आणले जात आहे. विधेयकावरील चर्चेला सुरूवात करताना शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार नीलम गोऱ्हे यांनी अल्पवयीन मुलींचे यात कसे शोषण होते, हे तपशीलाने सांगितले. तसेच, सभागृहातील अनेक सदस्य डान्सबार बोलताना रंगून जातात. हे विधेयक डान्सबार थांबविण्याकरिता आहे, याचे भान सदस्यांनी ठेवावे, असे स्त्रियांच्या अधिकाराकरिता काम करणारी कार्यकर्ती म्हणून विनंती करत असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले.

तीन एफआयआर झाले

गोऱ्हे यांच्यानंतर बोलण्याकरिता उभे राहिलेल्या अनिल परब यांनी, तुमचा मंत्री डान्स बार चालवतो. तीनतीन एफआयआर झाले. मंत्र्याचे डान्सबार बंद करण्याकरिता आपण मुख्यमंत्र्य़ांना पत्रे दिली होती. त्याचे आधी काय झाले, ते सांगा, अशी विचारणा केली. त्यावर गोऱ्हे यांनी जोरदार आक्षेप घेतला. तुम्ही हा तपशील सभागृहात आधीही मांडला आहे. त्यावर संबंधितांनी निवेदन दिले आहे. तरीही तुम्ही तेच आरोप करत आहात, असे म्हणत हा विषय येथे उपस्थित करू नका, असा आक्षेप घेतला.

तुम्ही आताच महिलांच्या प्रतिष्ठेवर बोलला…

त्यावर अनिल परब यांनी, तुम्ही आताच महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत होता. आता तुम्ही आक्षेप घेत आहात. ही दुहेरी भूमिका असल्याचा आरोप परब यांनी केला. तेवढ्यात राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात येऊन, मंत्री डान्सबार चालवितात, हे विधान कामकाजातून वगळण्याची मागणी केली. सभापतींनी अनिल परब यांनी कुणाचे नाव घेतले नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कदम वादग्रस्त वक्तव्य वगळण्यावर ठाम होते. हे वक्तव्य वगळले गेले नाही, तर माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी कसे डान्सबार चालत, हे मला उघड करावे लागेल, असा इशारा कदम यांनी दिला. अखेर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करत परब यांचे वादग्रस्त वक्तव्य वगळण्याची विनंती सभापतींना केली. त्यानुसार ते वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.