मुंबई : मुंबई पालिकेत आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर या भ्रष्टाचारात बरोबरीची भागीदार भाजप होती का? आम्ही भ्रष्टाचार करत होतो तेव्हा चौकीदार कोण होते त्यांनी आम्हाला का थांबवले नाही कारण ते चौकीदार होते. आणि त्यांनी ह्या भ्रष्टाचार मध्ये पार्टनर होते का असे प्रश्न शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार ॲड अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केले.
मुंबईतील नालेसफाई आणि मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादाला आज विधान परिषदेत नवे वळण मिळाले. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत, २००२ ते २०१७ या काळात मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती आणि सर्व महत्त्वाचे निर्णय दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे घेतले होते, असे स्पष्ट केले.
परब म्हणाले की, कालच्या त्यांच्या भाषणाचा हेतू कोणत्याही एका पक्षावर आरोप करणे नव्हता. मुंबईतील नालेसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी प्रभावी नियंत्रण ठेवावे, एवढीच त्यांची भूमिका होती. मात्र, प्रसाद लाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचा दावा त्यांनी केला. वरिष्ठांना खुश करणे हेच काम लाड यांचे असते. आपले दुकान बंद होऊ नये म्हणून ते अशी भाषणे करतात.
मुंबई महापालिकेत २००२ पासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. त्या काळात महापौर शिवसेनेचा तर उपमहापौर भाजपचा होता. स्थायी समितीसह महापालिकेतील सर्व महत्त्वाचे निर्णय दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्रितपणे घेतले. त्यामुळे आज शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपने त्या काळातील आपल्या भूमिकेचेही स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी परब यांनी केली.
“जर प्रसाद लाड यांचे आरोप खरे मानले, तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की त्या काळात सत्तेत सहभागी असलेला भाजपही त्याचा भागीदार होता. आम्ही जर लुटारू असू, तर त्या लुटीचा चौकीदार भाजप होता. मग त्यांनी ती कथित लूट कशी होऊ दिली?” असा सवाल परब यांनी उपस्थित केला.
मिठी नदीतील गाळ, नालेसफाई, उंदीर मारण्याची कंत्राटे यांसारख्या विषयांवर आरोप करण्यापूर्वी अभ्यास करून बोलावे, असा सल्लाही त्यांनी प्रसाद लाड यांना दिला. वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी आरोप करण्याऐवजी वस्तुस्थिती मांडावी, अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबई महापालिकेतील २००५ पासूनच्या सर्व व्यवहारांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आपण यापूर्वीही केली असल्याचे परब यांनी सांगितले. “जर भ्रष्टाचार झाला असेल, तर त्याची चौकशी व्हावी. पण त्या काळात सत्तेत सहभागी असलेल्या भाजपची जबाबदारीही तितकीच आहे,” असे सांगत त्यांनी प्रसाद लाड यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
