ST Workers Protest : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर दुपारी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली, शिवाय राजकीय वर्तुळात देखील तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

ST Agitation : शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ बाहेर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; चप्पलफेक आणि जोरदार घोषणाबाजी

अनिल परब म्हणाले, “अशाप्रकारे आंदोलनं करून किंवा अशाप्रकारे कायदा हातात घेऊन कोणाच्याच हाती काही लागणार नाही. त्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान होईल आणि म्हणून पुन्हा एकदा आवाहन करतो, की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करा. न्यायलयाने आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आम्ही देखील आपल्याला वारंवार आवाहन केलं होतं, कारवाई मागे घेतली होती. परंतु काल उच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलेलं आहे. उच्च न्यायालयाचा आदर राखत आपण सर्वांनी कामावर रूजू व्हावं आणि एसटी व्यवस्थित सुरू करावी.”

शरद पवारांच्या घराबाहेर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले….

तसेच, “आज घडलेल्या प्रकाराचा आता तपास सुरू होईल आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. हे दुर्दैवी आणि निंदनीय आहे की अशाप्रकारे कोणाच्याही घरी जाऊन आंदोलनं करणं. आम्ही वारंवार सांगतो आहोत की मागील पाच महिने एसटी प्रचंड तोट्यात असताना देखील, आम्ही कधीच आताताई पाऊल उचललं नाही. कारण, सर्वसाधारण अशावेळी मेस्मा कायदा लावला जातो, ज्यावेळी अत्यावश्यक सेवा बंद पडतात त्यावेळा मेस्मा कायदा लावला जातो. परंतु तरी देखील आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लावला नाही. आम्ही नेहमी एसटी कर्मचाऱ्यांच्याबाबत सहानभुतीपूर्वकच विचार केला. त्यांचे पगार वाढवले, आम्ही त्यांना वारंवार सांगतो होतो की तुम्ही येऊन चर्चा करा, आम्ही तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत. परंतु जनतेला वेठीला धरून हा संप पुढे चालू शकणार नाही किंवा अशाप्रकारची चर्चा पुन्हा होणार नाही, ही भूमिका आम्ही सुरुवातीपासूनच मांडली होती. म्हणून कामगारांनी कामावर रुजू होणं हे त्यावरचं एकमेव उत्तर आहे.” असं देखील अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.

परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम!

तर, “२२ एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर हजर होतील, यांच्यावर कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही. कालच न्यायालयाने सांगितलेलं आहे की, जे कामगार न्यायालायाने दिलेल्या मुदतीत कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. ” अशा शब्दांमध्य काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिलेला आहे.