लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हल्ले करण्याबरोबरच प्राण्यांना ठार मारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्राणीप्रेमी आक्रमक झाले असून प्राणीविषयक कायदे अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी अंधेरीमधील एक भटका कुत्रा एअरगनची गोळी लागून जखमी झाला होता. यापूर्वी कांदिवली येथे पाच भटक्या कुत्र्यांना ठार मारून त्यांचे मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकण्यात आले होते. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. प्राण्यांशी संबंधित कायदे आणखी कडक करण्याची गरज निर्माण झाली आह, असे प्राणीमित्र, पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-निर्मलनगरमधील संक्रमण शिबिरार्थींच्या लढ्याला यश; मुळ भाडेकरुंना मिळणार निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी घरे

प्रचलित कायदे आणि नवीन कायदे कसे असावेत याबाबत त्यांनी काही सूचना केल्या आहेत. प्राण्यांवरील क्रूरतेशी संबंधित कायदे अजामीनपात्र असावेत. दंड किंवा दंडात्मक कारवाईत किमान २५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक दंड असावा, एखादी व्यक्ती कुत्रा, मांजर यांना मारण्यासाठी बंदूक, तलवार किंवा चाकू वापरतो तेव्हा त्याच्या क्रूरतेची आणि गुन्हेगारी मानसिकतेची पातळी आपण समजू शकतो. एखादी व्यक्ती कुत्र्याला मारते, तेव्हा पोलीस केवळ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३५ अंतर्गत गुन्हा नोंदवतात. मात्र कलम ३३५ जामीनपात्र आहे. त्यामुळे प्राण्यांशी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. हे गुन्हे अजामीनपात्र करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- तृतीय वर्ष ‘बी. कॉम.’ पाचव्या सत्र परीक्षेत ४१.७५ टक्के उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून १८ दिवसांत निकाल जाहीर

या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्राणीप्रेमी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. प्राण्यांबाबतचे कायदे कडक करावे, असे मत त्यांनीही व्यक्त केले आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी पाच भटक्या कुत्र्यांना ठार मारून त्यांचे मृतदेह नाल्यात फेकण्यात आले होते. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी काही जणांविरोधात कारवाई केली. पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले, मात्र त्यांच्यावर जुजबी कारवाई करण्यात आली. दरम्यानच्या काळात अँटॉप हिल येथेही चार कुत्र्यांना ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याबाबतही पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. भविष्यात घटना घडू नयेत यासाठी कायद्यात सुधारण करणे आवश्यक आहे, असे मते प्राणीप्रेमींनी माध्यमांशी बोलताना व्यक्त व्यक्त केले.

Story img Loader