शर्यतींसाठी बैलांचे हाल केले जात नसल्याचा दावा

बैलगाडय़ांच्या शर्यतींमध्ये बैलांचे कोणत्याही प्रकारे हाल केले जात नाहीत, असा दावा करीत बैलगाडय़ांच्या शर्यतींना राज्य प्राणी कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पाठिंबा दिला आहे. प्राणी कल्याण मंडळाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन, सदस्या अंबिका निज्जर यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत बैलगाडय़ांच्या शर्यती व जल्लीकट्टू या खेळांना विरोध करून उच्च व सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत असताना मंडळाचे उपाध्यक्षच शर्यतींना पाठिंबा देत असल्याने मंडळाची भूमिका काय राहणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. या मंडळाची नियुक्ती होऊन दोन महिने उलटले तरी अजून पहिली बैठकही होऊ शकलेली नाही.

Traffic jam, Kalyan Dombivli,
कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण
ramdas tadas
‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा
Gajanan Kirtikar criticizes Narendra Modi for guarding Parliament
संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा! शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत

बैलगाडय़ांच्या शर्यती व तामिळनाडूत जल्लीकट्टू या खेळांमध्ये बैलांचे हाल केले जातात, मद्य किंवा उत्तेजक पदार्थ पाजले जातात, डोळ्यांत तिखट टाकले जाते किंवा अनेक हाल केले जातात, यासाठी प्राणिमित्र संघटनांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेली काही वर्षे लढा दिला. त्यावर बंदी आणली गेली होती. मात्र तामिळनाडूत मोठे जनआंदोलन झाल्यावर बंदी उठविली गेल्यावर महाराष्ट्रातही सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन बैलगाडय़ांच्या शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारने कायदेशीर दुरुस्ती केली व त्यास राष्ट्रपतींनीही संमती दिली आहे. मात्र राज्य सरकारने अजून नियमावली तयार न केल्याने उच्च न्यायालयाने शर्यतींना तूर्तास मनाई केली आहे.

हे नियम तयार करण्याचे काम सध्या सुरू असून ते लागू करून शर्यती सुरू कराव्यात, अशी भूमिका राज्य प्राणी कल्याण मंडळाच्या (अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड) उपाध्यक्षांनीच घेतली आहे. प्राण्यांना त्रास दिला जाऊ नये, याचा विचार करण्याऐवजी आमदार मुरकुटे यांनी शर्यतींचेच समर्थन केले. शर्यतीमध्ये बैलांचे कोणतेही हाल होत नाहीत, शेतकरी त्यांना मुलाप्रमाणे जपतात, काही ठिकाणी एखादा त्रास देण्याचा प्रकार झाला असेल, पण त्यासाठी शर्यतींवर बंदी नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुस्ती, धावणे आदी अन्य खेळांमध्ये खेळाडूही उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बैलांना उत्तेजक पदार्थ दिल्याचा क्वचित एखादा प्रकार घडला, तरी त्याविरोधात नियम तयार करून कारवाई करता येऊ शकेल, पण पारंपरिक खेळ असलेल्या शर्यतींवर बंदी नको, असे मुरकुटे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

राज्य प्राणी कल्याण मंडळाच्या अध्यक्षा खासदार महाजन यांची नियुक्ती होऊन वर्ष उलटले आणि अन्य सदस्यांच्या नियुक्त्या होऊन दोन महिने झाले, तरी अजून या मंडळाची एकही बैठक पार पडलेली नाही. महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाचे दौरे, सभा, मेळावे, मिरवणुका, भारत जोडो आंदोलन, खेल भारत अभियान आदींमध्ये देशभर दौरे करण्यात व्यस्त असल्याने त्यांनी या मंडळाकडे लक्षही दिलेले नाही.

मात्र त्यांनी व सदस्या निज्जर यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत बैलगाडय़ांच्या शर्यतींना विरोध करून न्यायालयातही दाद मागितलेली आहे. राज्य सरकार या शर्यतींसाठी नियमावली तयार करीत असताना प्राणी कल्याण मंडळाची भूमिका महत्त्वाची असून बैलांना त्रास होऊ नये, क्रूरतेची वागणूक दिली जाऊ नये, यासाठी किमान मंडळाने पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र बैलांचे हाल केलेच जात नसल्याचे सांगून उपाध्यक्षच समर्थन करीत असल्याने राजकीय दबावामुळे या शर्यतींना लवकरच हिरवा कंदील मिळण्याची चिन्हे आहेत.