मुंबई : दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतच्या आपल्या संबंधांना ‘विवाह’ म्हणून मान्यता देण्याची अभिनेत्री अनिता अडवाणी यांनी याचिकेद्वारे केलेली मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. दिंडोशी न्यायालयाने अडवाणी यांचा याबाबतचा दिवाणी दावाफेटाळण्याच्या निर्णयाला अपिलाद्वारे आव्हान दिले होते. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने त्यांच्या या अपिलावर निर्णय देताना ते फेटाळून लावले.
दिंडोशी दिवाणी न्यायालयाने २०१७ मध्ये अडवाणी यांचा दावा तांत्रिक कारणास्तव फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अडवाणी यांच्या वकिलांनी तसेच डिंपल कपाडिया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर एकलपीठाने उपरोक्त निर्णय दिला. तसेच, पहिले अपील फेटाळण्यात आले आहे, असे आदेशात नमूद केले.
अडवाणी आणि कपाडिया यांच्यात २०१२ पासून अनेक कायदेशीर लढाया सुरू आहेत. यामध्ये, या प्रकारणाचाही समावेश आहे. अडवाणी यांनी वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात कपाडिया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करणारी फौजदारी तक्रारही दाखल केली होती. त्यात राजेश खन्ना यांच्या निधनानंतर, त्यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्यातून आपल्याला बाहेर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.
दरम्यान, उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्या विरोधातील कौटुंबिक हिंसाचाराची कार्यवाही रद्द केली होती. त्यात, अडवाणी आणि राजेश खन्ना यांच्यातील संबंध हे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत विवाहाचे संबंध मानले जाऊ शकत नाहीत, असा निर्वाळा न्यायालयाने दिला होता.
