मुंबई : नाशिक मधील विकृत भोंदू बाबा अशोक खरात याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ वेळा फोन केला. या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या गंभीर आरोपानंतर सेनेचे नेते, मंत्री शिंदे यांच्या बचावासाठी मैदानात उतरले. अशा बिनबुडाच्या आरोपांमुळे शिंदे यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि महत्व कमी होणार नाही. उलट लोकांच्या मनातील त्यांच्याबद्दलचा भाव आणखी वाढेल, असा युक्तिवाद उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. दमानिया यांच्याकडे गेलेल्या सीडीआर ची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामंत यांनी केली.

दमानिया यांच्याकडे गेलेल्या सी डी आर ची चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे जाहीर केले. भोंदूबाबा खरात याला रूपाली चाकणकर यांनी वर्षभरात एकूण 177 फोन केले होते. असा गंभीर आरोप दमानिया यांनी करताना त्यांनी शिंदे यांनीही खरात याला १७ वेळा फोन केल्याचा खळबळजनक आरोप केला. दमानिया यांच्या आरोपानंतर गेली दोन दिवस शिंदे यांची पाठराखण करण्यासाठी त्यांचे मंत्री व प्रवक्ते मैदानात उतरले आहेत. दमानिया यांना मिळालेले सीडीआर हे एका हॉटेलच्या लेटरहेडवर होता.

सीडीआर मिळाला असता तर त्याची कॉपी त्यांनी सादर केली असती. या आरोपानंतर शिंदे यांचे नेतृत्व कमी होणार नाही. उलट ते वाढेल. असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. दमानिया यांना तो कागद पुरवठा करणारा अधिकाऱ्याची आणि एकूणच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी सामंत यांनी केली. शिंदे यांना लक्ष करून उपयोग होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊन एका अर्थाने खरात त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला.

दमानिया या रॉ च्या एजंट आहेत का? सीडीआर हा कोणालाही मिळत नसतो. शिंदे यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला तर तो यशस्वी होणार नाही शिंदे हे राजकारणात कच्चे नाहीत, इशारा आमदार मनीषा कांदे यांनी दिला. पक्षाचे मुख्य नेता शिंदे यांच्या बचावासाठी मैदानात उतरलेल्या शिंदे सेना त्यांचे कोकणातील नेते दीपक केसरकर यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपा नंतर मात्र गप्प होती. केसरकर यांना त्यावेळी एकटे पाडण्यात आले होते.