सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकनाथ खडसे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या भाषणात खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरली आहे. त्यामुळे खडसे यांच्यावर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याबाबत दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे. या पत्रात त्यांनी खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी जळगावच्या पोलीस अधिक्षकांकडेही तक्रार दाखल केल्याचे समजते. दमानिया यांच्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या वाढदिवशी मुक्ताईनगर मतदारसंघात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खडसे यांनी व्यासपीठावरून आपल्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली. एका स्थानिक वाहिनीवरून खडसे यांचे हे भाषण प्रसारित करण्यात आले होते. त्या भाषणामधील एक क्लीप दमानिया यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी ही क्लीप मुख्यमंत्र्यांनाही पाठवल्याचे समजते. खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवणे आणि मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केलेल्या गंभीर आरोपांची आतापर्यंत काय चौकशी केली, असा सवाल करत त्याचा तीन आठवडय़ांत खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. खडसे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे सरकारने याप्रकरणी आवश्यक ती चौकशी केल्याचे स्पष्ट झाले, तर दमानिया यांची याचिका निकाली काढली जाईल. मात्र सरकारने गेल्या दहा महिन्यांपासून काहीच चौकशी केलेली नाही असे उघड झाल्यास न्यायालय बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही वा डोळ्यावर झापड लावूनही बसणार नाही, असा इशाराही न्यायालयाने सरकारला या वेळी दिला होता. आपल्यासह आपल्या कुटुंबीयांवर आरोप करणारी आणि त्या आरोपांच्या चौकशीची मागणी करणारी दमानिया यांच्यासह आणखी चार जणांनी केलेली याचिका राजकीय हेतूने प्रेरित आहे. दमानिया यांच्यासह प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्या या याचिका फेटाळून लावण्याच्या मागणीसाठी खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती.