दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षात सुरू झालेल्या सत्तासंघर्षाला रोज नवे वळण मिळत आहे. आता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांनी ‘आप’ला रामराम ठोकला आहे. ट्विटरवर ‘आय क्विट’ असा संदेश लिहून त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला.
सध्या पक्षामध्ये सुरू असलेला मूर्खपणा करण्यासाठी मी ‘आप’मध्ये आले नव्हते. माझा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास होता. त्यांच्या तत्त्वांसाठी मी त्यांना पाठिंबा दिला होता. घोडेबाजार करण्यासाठी मी आले नव्हते, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे ‘आप’मधील संघर्षाला आणखी नवे वळण मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘आप’चे मुंबईतील नेते मयांक गांधी यांनीसुद्धा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या नेत्यांना राजकीय व्यवहार समितीतून काढण्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयावर टीका केली होती. राष्ट्रीय कार्यकारिणीने अशा पद्धतीने निर्णय घ्यायला नको होता, असे त्यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले होते.
ट्विटरवरील संदेशात त्या म्हणतात, आप केवळ राजकीय पक्ष नाही. देशातील हजारो लोकांसाठी तो आशेचा किरण आहे. ‘आप’ने केवळ त्याच्या सिद्धांतांनुसारच काम केले पाहिजे. केलेल्या कृत्यांबद्दल पुढील ४८ तासांत अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी कार्यकर्त्यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी पक्षाने चौकशी करावी, अशीही मागणी केली असल्याचे त्यांनी लिहिले आहे.