मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील महाराष्ट्र राज्य परिचर्या व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाअंतर्गत एएनएम व जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी ९ नाेव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी दिलेल्या मुदतवाढीनंतर आता सीईटी कक्षाने प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची यादी व तात्पुरती गुणवत्ता यादी ५ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान जागांचा तपशील जाहीर करून ऑनलाइन पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. एएनएम अभ्यासक्रमासाठी पसंतीक्रम भरण्याची सुविधा केवळ महिला उमेदवारांसाठी उपलब्ध असेल.

एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांची पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी ९ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागेल. प्रवेशासाठी मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) वा धनादेश सादर करणे आवश्यक आहे. बँकेला सुटी असलेल्या दिवशीही धनादेशाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.

पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या उमेदवारांनी प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरच संबंधित उमेदवारांना दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरविले जाणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत जागा मिळाल्यानंतर प्रवेश न घेणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या फेरीत सहभागी होता येणार नाही.

१४ नोव्हेंबरला दुसऱ्या फेरीची निवड यादी

एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी जागांचा तपशील १३ नोव्हेंबरला जाहीर केला जाईल. त्यानंतर १४ नोव्हेंबरला दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध होईल. निवड झालेल्या उमेदवारांना १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान संबंधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागेल. दुसऱ्या प्रवेश फेरीनंतर १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान संस्थास्तरीय प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. मात्र, प्रवेश फेरीदरम्यान प्रवेश निश्चित केलेले उमेदवार संस्थास्तरीय प्रवेश फेरीसाठी पात्र राहणार नाहीत. या फेरीची सविस्तर प्रक्रिया व सूचना स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील.