मुंबई : तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोई याचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरारी आरोपी अनमोल बिश्णोई याने अधिकृतपणे शरणागती पत्करण्याची परवानगी मिळवण्यासाठी मुंबईतील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
निष्पक्ष आणि न्यायाच्या हिताकरिता सुरू असलेल्या खटल्याला सामोरे जाण्यासाठी आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्यासाठी त्याला न्यायालयासमोर स्वेच्छेने शरणागती पत्करायची आहे, असा दावाही अनमोल याने अर्जात केला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित केल्यानंतर अनमोल सध्या नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात बंदिस्त आहे. भारतात आल्यानंतर त्याला लॉरेन्स टोळीशी संबंधित एका दहशतवाद कृत्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती. विशेष न्यायालयाचे सत्यनारायण नावंदर यांनी सरकारी वकिलांना अनमोल याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
अनमोल याच्या अर्जानुसार, तो सध्या एनआयएने दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असला, तरी योग्य न्यायालयीन आदेशांशिवाय तो मुंबई न्यायालयासमोर हजर होऊ शकत नाही. त्यामुळेच त्याने तिहार तुरुंग प्रशासनाला त्याला न्यायालयासमोर हजर करण्याबाबत वॉरंट काढण्याची विनंती केली आहे. या विनंतीमुळे त्याची शरणागती अधिकृतपणे नोंदवली जाऊ शकेल आणि प्रत्यक्ष किंवा आभासी माध्यमातून त्याच्या कोठडीची कार्यवाही पूर्ण करता येईल.
शरणागतीची परवानगी दिल्यास अभियोग पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही. उलटपक्षी, यामुळे खटल्याची प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल आणि कायदेशीर प्रक्रियेतील अनावश्यक विलंब टाळता येईल, असा दावाही अनमोल याने अर्जात केला आहे. सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा खटला आधीच सुरू आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत अभियोग पक्षाच्या तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेल्याचेही त्याने अर्जात म्हटले आहे.
प्रकरण काय ?
सलमान याच्या वांद्रेस्थित ””गॅलेक्सी अपार्टमेंट्स”” या घराबाहेर १४ एप्रिल २०२४ रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी कथितरित्या गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ””मोक्का””अंतर्गत कारवाई केली आणि हा हल्ला लॉरेन्स बिश्णोई टोळीने घडवून आणल्याचा दावा केला. सध्या या प्रकरणात सह-आरोपी विकी गुप्ता, सागर पाल, सोनुकुमार बिश्णोई, मोहम्मद रफीक चौधरी आणि हरपाल सिंग यांच्या विरोधात खटला सुरू असून, हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. तर आणखी एक आरोपी, अनुज कुमार थापन याचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला होता.
