मुंबई : घाटकोपरमधील चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक बांधण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, ३१ जुलै रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल. चिरानगर येथील सुमारे १८,००० चौरस मीटर जागेवर ३०५ कोटी रुपये खर्च करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्मारक उभारणार आहे.

चिरानगर येथे अण्णा भाऊ साठे यांचे घर आहे. या वास्तूच्या जतनाचा निर्णय झोपु प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत २०१९ मध्ये घेतला होता. त्यानुसार घराचा परिसर विकसित करण्यासह स्मारकाची स्वतंत्र पाच मजली इमारत बांधण्याचे निश्चित करण्यात आले. ज्या भूखंडावर स्मारक बांधले जाणार आहे, तेथील रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण करून त्यांचे स्थलांतर करण्यास विलंब होत असल्याने प्रकल्प लांबणीवर पडल्याचे चित्र होते. पण अखेर गेल्या वर्षी या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ती सध्या अंतिम टप्प्यात आहे.

शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी ११ वाजता चिरानगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अंदाजे १८,००० चौरस मीटर जागेवर दोन टप्प्यांत स्मारकाचे बांधकाम करण्यात येईल. या कामासाठी या जागेवरील अंदाजे ७०० झोपड्या बाधित झाल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्याच्या कामासाठी २५० झोपड्यांचे लगतच पुनर्वसन करून ७,५०० चौरस मीटर जागा बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. भूमिपूजनानंतर पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाईल. या प्रकल्पाचे काम तीन वर्षांत पूर्ण करून स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजन झोपु प्राधिकरणाचे आहे.

प्रकल्प असा…

प्राचीन लोककला, शाहिरी कला यांची ओळख होण्यासाठी अण्णा भाऊ साठे कक्ष, शाहीर अमर शेख कक्ष, शोषितांच्या लढ्याची साक्ष देणारे कक्ष, साहित्य कक्ष, दृक््श्राव्य कक्ष, कला-साहित्य कक्ष, ५०० आसनी सभागृह, ३०० व २५० आसनी दोन चित्रपटगृहे, तालीम खोली, प्रशासकीय कार्यालय, उपहारगृह, पुस्तक विक्री दुकाने, भेटवस्तूंची दुकाने, प्रदर्शन कक्ष अशा अनेक सुविधा या स्मारकात असतील.

प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रही उभारण्यात येईल. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षण- संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. तर अण्णा भाऊ साठे यांचा २० मीटर उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात येईल.