मुंबई : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे मुंबईतील चिराग नगर येथे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र, त्यादृष्टीने सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नव्हते. पण आमचे सरकार आले तेव्हा आम्ही २०१६ मध्ये चिराग नगरातील अण्णा भाऊंचे भव्यदिव्य स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने ठोस पावले उचलली व आज स्मारकाचे भूमिपूजन होत आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वेळापत्रकानुसार चार वर्षांचा अवधी जाईल. पण जुलै २०२९ मध्येच या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
स्मारकाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. अण्णा भाऊ साठे हे वंचित, कष्टकरी, कामगारांचा आवाज होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी या समाजघटकांचे दु:ख मांडले. जागतिक स्तरावर गौरविलेल्या अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक भव्यदिव्य असेच असेल, असेही यावेळी ते म्हणाले.
स्मारक बांधण्याचा निर्णय झाल्यनंतर २०१९मध्ये या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली. प्रकल्पाचा आराखडा व इतर कामे पूर्ण करून गेल्या वर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भूमिपूजनाचा निर्णय झोपु प्राधिकरणाने घेतला. त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिरागनगर येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
झोपु प्रकल्पाअंतर्गत पहिल्यांदाच झोपडीधारकांच्या पुनर्वसनासह स्मारकाची उभारणी केली जात आहे. खासगी विकासकांच्या माध्यमातून पुनर्वसन केले जाते. चिराग नगर झोपु प्रकल्प स्वत: झोपु प्राधिकरण करणार असून स्मारकाचे बांधकाम केले जाणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच या प्रकल्पासाठी काही झोपड्या हटवाव्या लागणार होत्या. पात्र रहिवाशांचेच पुनर्वसन नियमानुसार होते. पण वंचितांचा आवाज असलेल्या अण्णा भाऊंचे स्मारक बांधताना वंचितांना उद्ध्वस्त करता येणार नव्हते. त्यामुळे या प्रकल्पात पात्र-अपात्र सर्वांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
विद्रोहाची धार अण्णा भाऊंच्या साहित्याला विद्रोहाची धार होती. स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे कार्य मोलाचे आहे. अण्णा भाऊ व अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तरुणांच्या रक्तात सळसळ निर्माण करून त्यांना आंदोलनात उतरवले. मातंग समाज म्हणजे कलावंतांची खाण आहे. पण आजही काही प्रमाणात या समाजात शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण दिसत आहे. ते घालविण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येतील. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हे स्मारक असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
