मुंबई : देशभरातील सर्वच मंदिरामध्ये वितरित करण्यात येणाऱ्या प्रसादाची उच्चस्तरीय तपासणी करावी, तसेच प्रसादाला विशेष दर्जा देऊन तो बनविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) पत्र पाठवून केली आहे.

तिरुपतीस्थित श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांच्या नमुन्यांमध्ये प्राण्याची चरबी आढळल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानमने स्पष्ट केले. देवस्थानमने भाविकांच्या भावना व विश्वास याच्याशी खेळ केला आहे. या प्रकरणाने देशभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तिरुपतीप्रमाणे देशातील विविध मंदिरांमध्ये प्रशासनाकडून लाडूच्या प्रसादाचे वाटप केले जाते. तिरुपती येथील प्रकरणानंतर या सर्व मंदिरांमधील प्रसादाची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच मंदिरांमधील लाडूच्या प्रसादाची उच्चस्तरीय समितीमार्फत तपासणी करावी. तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण त्यांच्या नियमांमध्ये सुधारणा करून प्रसादाला विशेष दर्जा द्यावा, तसेच प्रसाद बनविण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावी. मुख्यत्वे प्रसादामध्ये कोणत्या घटकांचा वापर करू नये याची यादी जाहीर करावी. ही मार्गदर्शक तत्त्वे सात दिवसांमध्ये जाहीर करावी. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनने ‘एफएसएसएआय’ला पाठवलेल्या पत्रात केली आहे. तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही न केल्यास या मुद्द्यावर न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशाराही ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनचे अध्यक्ष अभय पाण्डेय यांनी दिला आहे.

हेही वाचा – मुंबईत स्वच्छतेचा जागर; स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता संवाद, स्वच्छता फेरी, मानवी साखळी, जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन

हेही वाचा – २० वर्षे फरार आरोपी अटकेत

मंदिरात पुरवठा करण्यात येणारे तूप, दूध व अन्य पदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसते. तसेच त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून बाहेरील सुविधेचा वापरही केला जात नाही. मंदिराला साहित्य पुरवठा करणारे पुरवठादार त्याचाच फायदा घेत असल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रकरणातून उघडकीस आले आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने स्थानिक अन्न व औषध प्रशासनाला त्यांच्या राज्यातील मंदिरांमध्ये अशा प्रकारे बनविण्यात येणाऱ्या प्रसादाची अधूनमधून तपसाणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही अभय पाण्डेय यांनी केली.

Story img Loader