मुंबई : एका निनावी पत्रामुळे मालाडमधील चोरीचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अदानी वीज कंपनीने केलेल्या कारवाईत १६ घरांना अनधिकृत वीज जोडणी दिल्याचे आढळले. याप्रकरणी बांगून नगर पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अदानी वीज कंपनीच्या कार्यालयात ४ जून रोजी एक निनावी पत्र आले. मालाडच्या लिंक रोड येथील शिवधाम ब्लॉकच्या मागील मुथूमरियम रहिवाशी संघ येथील अनधिकृत चाळीना बेकायदेशीर वीज जोडणी दिल्याची माहिती या पत्रात देण्यात आली होती.
तशाच प्रकारची एक तक्रार कंपनीला ऑनलाईन मिळाली होती. दोन्ही तक्रारी एकाच प्रकारच्या होत्या. पत्र आणि तक्रारीची शहानिशा करण्यासाठी दक्षता अधिकारी मिहीर आफळे यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी भेट दिली. येथील १६ घरांना वीज आणि पाण्याच्या पंपाना बेकायदेशीररित्या वीज जोडणी देण्यात आली होती. सुमारे साडेसहा लाखांची २८ हजार युनीट वीज चोरी करण्यात आल्याचे यावेळी आढळले. बेकायदेशीर वीज जोडणी देणारा आरोपी निलेश हरिजन याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय विद्युत अधिनिमयाच्या कलम १३५, १३८, १५० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वीज चोरी प्रकरणी दुसरी कारवाई गोरेगाव लिंक रोडवरील मोतिलाल नगर येथे करण्यात आली. आरोपी ओमप्रकाश शर्मा बेकायेदशीरित्या वीज जोडणी घेत असल्याचे आढळले. साडेतीन लाखांची वीज चोरी केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.