scorecardresearch

‘एनआयए’ने अटक केलेल्या सलीम फ्रुटविरोधात आणखी गुन्हा

एका इमारतीमध्ये मालकी हक्क मिळविल्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘एनआयए’ने अटक केलेल्या सलीम फ्रुटविरोधात आणखी गुन्हा
( संग्रहित छायचित्र )

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) अटक केलेल्या सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याच्या विरोधात आता दादर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका इमारतीमध्ये मालकी हक्क मिळविल्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम फ्रुटसह याप्रकरणी एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नळबाजार परिसरात राहात असलेले मोहम्मद रफीक (४७) हे जमिनीच्या खरेदी विक्रीत दलालीचे काम करतात.  त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रफीक राहात असलेली इमारत त्यांच्या मालकीची आहे. त्यांच्या चुलत भावाच्या सात मुलांनी या इमारतीतील ५० टक्के भाग हा २१ लाख रुपयांना सलीम कुरेशी याला विकल्याची माहिती त्यांना मिळाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे हा व्यवहार करण्यात आला होता.  यात शासनाचेही आर्थिक नुकसान करून फसवणूक करण्यात आल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने इमारतीची नोंदणी दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्यामुळे याप्रकरणी दादरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दाऊद टोळीच्या संबंधावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकतीच सलीम फ्रुट याला अटक केली असून तो एनआयएच्या कोठडीत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.