मुंबई: आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी अशक्य असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचबरोबर भविष्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीला त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्येही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहील, असे सूतोवाच केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल असा सूर लावला. पटोले यांच्या भूमिके वर शिवसेनेने टीकेची झोड उठविली. काँग्रेस सोबत येत नसेल, तर शिवसेना-राष्ट्रवादी युती होणार, असे संकेत दोन्ही पक्षातून देण्यात आले. त्यावर सोमवारी माध्यमांशी बोलताना पटोले यांनी २०२४च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, मात्र भाजपविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्तकेली. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होणार की नाही, यावरून वाद सुरू झाला असतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे.