scorecardresearch

८६ टक्के मुंबईकरांमध्ये प्रतिपिंडे

महापालिकेच्या ‘सेरो सर्वेक्षणा’तील निष्कर्ष मुंबई : करोना साथीच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना मुंबई महापालिकेने दिलासादायक माहिती दिली आहे. मुंबईत केलेल्या पाचव्या ‘सेरो सर्वेक्षणा’त ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये करोना प्रतिपिंडे आढळली आहेत. मुंबई महापालिकेने शुक्रवारी पाचव्या ‘सेरो सर्वेक्षणा’तील निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार  लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी प्रतिपिंडे विकसित झालेल्यांची संख्या ९०.२६ टक्के आहे. तर लसीकरण […]

८६ टक्के मुंबईकरांमध्ये प्रतिपिंडे

महापालिकेच्या ‘सेरो सर्वेक्षणा’तील निष्कर्ष

मुंबई : करोना साथीच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना मुंबई महापालिकेने दिलासादायक माहिती दिली आहे. मुंबईत केलेल्या पाचव्या ‘सेरो सर्वेक्षणा’त ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये करोना प्रतिपिंडे आढळली आहेत.

मुंबई महापालिकेने शुक्रवारी पाचव्या ‘सेरो सर्वेक्षणा’तील निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार  लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी प्रतिपिंडे विकसित झालेल्यांची संख्या ९०.२६ टक्के आहे. तर लसीकरण न झालेल्यांपैकी ७९.८६ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळली. मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगरझोपडपट्टी परिसरांमधील नागरिकांमध्ये प्रतिपिंडे विकसित होण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्षही या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

सेरो सर्वेक्षणात रक्त नमुन्यांची चाचणी करून प्रतिपिंडे (करोनाच्या अ‍ॅण्टीबॉडीज्) शोधली जातात. मुंबईत आतापर्यंत तीन वेळा सेरो सर्वेक्षण करण्यात आले, तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण करण्यात आले. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ८,६७४ नागरिकांमध्ये पूर्वसंमतीने पाचवे सेरो सर्वेक्षण करण्यात आले.

महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय यांच्या वतीने आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात आला. महापालिकेचे दवाखाने आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे येणाऱ्या रुग्णांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला.

पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या औषध विभागप्रमुख डॉ. सीमा बनसोडे-गोखे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुजाता बावेजा यांनी प्रमुख अन्वेषक म्हणून या सर्वेक्षणात योगदान दिले, तर सहअन्वेषक म्हणून नायर रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. जयंती शास्त्री तसेच डॉ. पल्लवी शेळके, डॉ. श्रीपाद टाकळीकर, डॉ. डेस्मा डिसूझा, डॉ. किरण जगताप, डॉ. कल्याणी इंगोले यांनी सहभाग घेतला.

सामूहिक प्रतिकारशक्ती अद्याप नाही!

८६ टक्के  नागरिकांमध्ये करोना प्रतिपिंडे आढळली असली तरी त्याला सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणता येणार नाही. मात्र ‘आयसीएमआर’च्या म्हणण्यानुसार चार-पाच महिन्यांत आपण ‘एन्डेमिक’ स्थितीकडे जाऊ. म्हणजे स्वाईन फ्लूप्रमाणे हा विषाणू आपल्याबरोबर राहील, पण त्याची काळजी करण्याची गरज नाही. तरीही करोना प्रतिबंधात्मक उपाय, मुखपट्टीचा वापर करावाच लागेल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

ठळक नोंदी

झोपडपट्टीत सुमारे ८७.०२ टक्के, तर बिगरझोपडपट्टी भागांत सुमारे ८६.२२ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे

पुरुषांमध्ये ८५.०७ टक्के, तर स्त्रियांमध्ये ८८.२९ टक्के सेरो सकारात्मकता

सर्वेक्षण केलेल्यांपैकी ६५ टक्के नागरिकांनी लस घेतली होती, तर ३५ टक्के नागरिकांनी एकही मात्रा घेतली नव्हती

लस घेतलेल्यांपैकी सुमारे ९०.२६ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे विकसित

लस न घेतलेल्या सुमारे ७९.८६ टक्के नागरिकांमध्येही प्रतिपिंडे आढळली

सर्वेक्षणातील २० टक्के नमुने आरोग्य कर्मचाऱ्यांचे होते.  या गटात प्रतिपिंडांचे प्रमाण ८७.१४ टक्के

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2021 at 01:29 IST

संबंधित बातम्या