मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि त्यानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या झालेल्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने शनिवारी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर आठ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले. त्यामुळे या सगळ्यांवर हत्या आणि बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (युएपीए) खटला चालवला जाणार आहे.
वाझे, शर्मा यांच्यासह अन्य आरोपींनी ते निर्दोष असल्याचे सांगितल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी त्यांच्यावर उपरोक्त आरोपांतर्गत आरोप निश्चित केले.
अंबानी यांच्या ”अँटिलिया” या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली एक एसयूव्ही गाडी आढळली होती. तर, ही गाडी आपली असून ती चोरीला गेल्याचा दावा करणाऱ्या हिरेन याचा ५ मार्च २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील एका खाडीजवळ मृतदेह आढळला होता. काही दिवसांनंतर या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली.
एनआयएच्या आरोपांनुसार, अंबानी यांच्या घराबाहेर एसयूव्ही उभी करण्यात वाझे यांचा सहभाग होता. श्रीमंत व्यक्तींमध्ये दहशत निर्माण करणे आणि एका उच्चपदस्थ राजकीय व्यक्तीने कथितरीत्या ठरवून दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या मासिक वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, हा त्यामागचा उद्देश होता. तसेच, ”सुपर कॉप” म्हणून आपली हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची इच्छाही माजी चकमकफेम पोलीस अधिकाऱ्याची होती. याशिवाय, या घटनेनंतर वाझे यांनी हिरेन याचाही काटा काढण्याचा कट रचला. हिरेन याने स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता आणि तो या स्फोटकांचा कट उघड करू शकतो, असा दावाही तपास यंत्रणेचा आहे.
