मुंबई : ‘ब्रिटानिका एन्सक्लोपिडिया’लाही बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मागे टाकले असते, असे निरीक्षण गंमतीने राष्ट्रीय तपास यंत्रणेअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने नोंदवले आहे. त्याने केलेला दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना वाझेच्या १४५ पानी अर्जावर न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. वाझे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्याने आता पाच वर्षांनंतर येत्या १ ॲागस्टपासून वाझेसह चकमकफेम प्रदीप शर्मा, सुनील माने आणि इतरांवर आरोप निश्चितीस सुरुवात होणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲटिलिया येथील निवासस्थानासमोर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॅार्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन (ठाण्यातील व्यावसायिक) हे ५ मार्च २०२१ रोजी मुंब्रा खाडीत मृतावस्थेत आढळले. हिरेन यांना या कटाची पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या हत्येमागील कटाचा मुख्य सूत्रधार वाझे असल्याचे स्पष्ट झाले. वाझेविरोधात पुरेसे नव्हे तर भक्कम पुरावे असल्याचे निरीक्षणही विशेष न्यायालयाने नोंदवले आहे.

या प्रकरणाशी आपला कसा संबंध नाही, हे स्पष्ट करणारा १५७ पानांचा अर्ज वाझे याने विशेष न्यायालयात केला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) १४५ पानांचे उत्तर देऊन या अर्जाला तीव्र विरोध केला. अखेर विशेष न्यायालयाने वाझे याचा दोषमुक्त करण्याचा च अर्ज फेटाळला. त्यामुळे आता वाझेसह चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, सुनील माने आदींसह इतरांवर आरोप निश्चितीस सुरुवात होणार आहे. दहशतवादविरोधी कारवाया कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील कलमांनुसार या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी सचिन वाझेच्या अर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाझे यांनी सोयीनुसार तत्त्वज्ञान, स्वतःचे दृष्टिकोन आणि चुकीचे संदर्भ दिले आहेत. जर या अर्जात अजून काही तपशील असता, तर या अर्जाने ‘ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया’लाही मागे टाकले असते. या संपूर्ण अर्जात फक्त ‘गुणवत्तेची’ कमतरता आहे. हा अर्ज म्हणजे खटला विनाकारण लांबवण्याचे एक अनावश्यक उदाहरण असल्याचे न्या. बावीस्कर यांनी म्हटले आहे.

वाझेच्या अर्जाला एनआयएने कडाडून विरोध केला. अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात वाझे मुख्य सूत्रधार होता, असे एनआयएने म्हटले आहे. या प्रकरणात एनआयएचे आरोपपत्र तब्बल १४ हजारपेक्षा जास्त पानांचे असून, त्यात ३०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब आणि विस्तृत इलेक्ट्रॉनिक पुरावे (सासीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशन्स) आदींचा समावेश आहे.

वाझेने यापूर्वीही कार्यक्षेत्र आणि योग्य मंजुरीच्या अभावाचा मुद्दा उपस्थित करून खटला बंद करण्याची मागणी केली होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये न्यायालयाने ती मागणी फेटाळली होती.याशिवाय, विघातयक कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलमांना आव्हान देणाऱ्या वाझेच्या याचिका उच्च तसेच दिल्ली न्यायालयाने यापूर्वीच फेटाळल्या आहेत. वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याचाही प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने अमान्य केला.